

नरेंद्र येरावार
उमरी: गेल्या काही वर्षाच्या कालखंडानंतर शुक्रवारपासून (दि.२६ डिसेंबर) रेल्वेचे पाच रुपयांनी तिकीट वाढले आहे. उमरी रेल्वे स्थानकावरून आता कोठेही जा पाच रुपये अधिकचे द्यावे लागणार आहेत. त्यामुळे पूर्वी उमरी ते नांदेड रेल्वेचे तिकीट दर 30 रुपये होते आणि आता 35 रुपये झाले आहेत.
माजी रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी त्यांच्या कार्यकाळात नांदेडचे तिकीट दर केवळ दहा रुपये केले होते. त्यानंतर कोरोनाकाळात तीस रुपये तिकीट दर झाले होते. आता तिकीट दर वाढल्याने अचानक वाढलेल्या तिकीट दरामुळे शुक्रवारी प्रवासी चकित झाले. महागाईच्या झळा आता रेल्वे तिकीट वाढल्याने प्रवाशांना सोसाव्या लागतील.
सर्वच रेल्वे स्थानकावरून आता रेल्वे प्रवाशांना पाच रुपये अधिकचे द्यावे लागणार आहेत. मात्र रेल्वे प्रवासाची सुविधा ही सुरक्षित आणि सोयीची असल्याने रेल्वे प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, हे मात्र विशेष आहे.