Krishna river water level 
बेळगाव

Karnataka flood situation : चिक्कोडी तालुक्यात पुन्हा पुराचा धोका; कृष्णा, दूधगंगा नद्यांच्या पाणीपातळीत ५ फुटांनी वाढ

Krishna river water level: कोरडे पडलेले नदीचे पात्र आता तुडुंब भरून वाहत असून, बघता बघता पाण्याची पातळी धोक्याच्या पातळीकडे सरकत आहे

पुढारी वृत्तसेवा

काशिनाथ सुळकुडे

चिकोडी : महाराष्ट्राच्या पश्चिम घाट परिसरात मान्सूनचा पाऊस धुमाकूळ घालत असून, याचा थेट परिणाम बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील नद्यांवर झाला आहे. महाराष्ट्रातील पाणलोट क्षेत्रात (कॅचमेंट एरिया) होत असलेल्या मुसळधार पावसामुळे चिक्कोडी तालुक्यातील प्रमुख नद्या असलेल्या कृष्णा, दूधगंगा आणि वेदगंगा नद्यांच्या पाणीपातळीत अवघ्या एका दिवसात तब्बल ५ फुटांनी वाढ झाली आहे.

नद्यांच्या पाणीपातळीत अचानक झालेल्या या वाढीमुळे नदीकाठच्या नागरिकांमध्ये पुन्हा एकदा पुराची भीती निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पूर्णपणे कोरड्या पडलेल्या कृष्णा नदीला आता महाराष्ट्रातील पावसामुळे अचानक संजीवनी मिळाली आहे. कोरडे पडलेले नदीचे पात्र आता तुडुंब भरून वाहत असून, बघता बघता पाण्याची पातळी धोक्याच्या पातळीकडे सरकत आहे.

मान्सूनच्या सुरुवातीला पावसाने दडी मारल्यामुळे चिंतेत असलेल्या लोकांना नदीत पाणी आल्याने एका बाजूला दिलासा मिळाला आहे. तर दुसऱ्या बाजूला पाण्याचा वाढता वेग आणि पातळी पाहून पुराची धास्ती लागली आहे.

जर महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात असाच पाऊस सुरू राहिला, तर नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहतील. नद्यांमधील पाण्याची आवक आणखी वाढणार असून, चिक्कोडी तालुक्यातील सखल भाग आणि नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरण्याची दाट शक्यता आहे. पाऊस असाच सुरू राहिल्यास कोणत्याही क्षणी पूरस्थिती निर्माण होऊ शकते, अशी भीती स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT