Satara News : निम्‍मा जून आला तरी वेण्णा नदी कोरडीच

पाणीटंचाईने नागरिक, शेतकरी चिंतेत : विहिरींची पाणीपातळी खालावली
Satara News
निम्‍मा जून आला तरी वेण्णा नदी कोरडीच
Published on
Updated on

केळघर : जावली तालुक्‍यातील बोंडारवाडी, केडंबे, केळघर आणि मेढा परिसराची वेण्‍णा नदी ही जीवनवाहिनी आहे. मात्र, जून महिना निम्‍मा होत आला तरी वेण्णा नदीचे पात्र अद्याप कोरडेच असल्याने स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरवर्षी साधारणपणे ७ ते १० जूनदरम्यान मान्सूनचे आगमन होताच नदी-नाले प्रवाहित होऊ लागतात. मात्र, यंदा पावसाने ओढ दिल्याने वेण्णा नदीच्या पात्रात केवळ खडक आणि वाळूचे ढीग दिसून येत आहेत. जून महिना सुरू होऊनही नदीत पाण्याचा प्रवाह नसल्याने परिसरातील जलस्रोतांवर ताण वाढला आहे.

वेण्णा नदीचे पात्र कोरडे पडल्यामुळे आसपासच्या गावांमधील विहिरींची पाणीपातळी खालावली आहे. अनेक गावांमध्ये गेल्या महिनाभरापासून तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून नागरिकांना खाजगी टँकरद्वारे पाणी खरेदी करावे लागत आहे. याचा परिणाम ग्रामीण जनजीवनावर होत असल्याचे चित्र आहे.

मे महिन्याच्या सुट्टीनिमित्त मुंबई, पुणे आदी शहरांतून गावी आलेल्या चाकरमान्यांनीही पाण्याच्या टंचाईमुळे गेल्या पंधरा दिवसांत पुन्हा शहरांकडे परतण्यास सुरुवात केली आहे. वेण्णा नदी बारमाही प्रवाहित राहण्यासाठी बोंडारवाडी धरण प्रकल्पाची गरज असल्याची भावना स्थानिक नागरिक आणि स्थलांतरित चाकरमान्यांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान, मृग नक्षत्र सुरू होऊनही समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगामातील पेरण्या रखडल्या आहेत. पेरणीपूर्व मशागत पूर्ण करून बियाणे व खतांची खरेदी केलेले शेतकरी आता दमदार पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसांत मान्सूनचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पश्‍चिम घाट परिसरात चांगला पाऊस झाल्यानंतरच वेण्णा नदी पुन्हा खळाळून वाहू लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news