बेळगाव ः केंद्र सरकारकडून राज्यावर अन्याय होत आहे. म्हणून, भाजपने केंद्र सरकारविरुद्ध मोर्चा काढावा, त्यांचा निषेध करावा, अशी टीका उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी मंगळवारी (दि.9) सर्किट हाऊसजवळ माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना केली.
राज्य सरकारविरुद्ध भाजपच्या मोर्चाबद्दल बोलताना शिवकुमार म्हणाले, केंद्र सरकार ऊस, मका, साखर, इथेनॉलसह प्रत्येक मुद्द्यावर अन्याय करत आहे. केंद्र सरकारकडून आपल्या राज्याला योग्या निधी मिळत नाही. भद्रा अप्पर प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात जाहीर केलेले 5,400 कोटी अद्याप दिलेले नाहीत. कृष्णा अप्पर प्रकल्पातील बाधित शेतकऱ्यांना 76,000 कोटींची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला आहे. मात्र केंद्र सरकारने या प्रकल्पासाठी राजपत्रित अधिसूचना जारी केलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी भाजपने केंद्र सरकारविरुद्ध लढावे. कोणत्याही भाजप खासदाराने याविरुद्ध आवज उठवलेला नाही. भाजपला शेतकऱ्यांबद्दल कोणताही आदर नाही.
आमच्यात फरक नाही
माझ्यात आणि मुख्यमंत्र्यांमध्ये कोणताही फरक नाही. आम्हाला यापूर्वी कारभार हाकताना कोणताही गोंधळ जाणवला नाही, आताही नाही आणि भविष्यातही होणार नाही. हायकमांड कधी बोलावतील मला माहीत नाही. त्यांनी माझ्याशी चर्चा केलेले मुद्दे मी तुम्हाला (माध्यमांना) आता उघड करणार नाही.