

बेळगाव : मी डॉ. प्रभाकर कोरे यांना मी काँग्रेसमध्ये बोलावले नाही आणि ते काँग्रेसमध्ये येणारसुद्धा नाहीत. मी केवळ त्यांची सदिच्छा भेट घेतली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिली.
शिवकुमार यांनी सोमवारी (दि. 20) डॉ. कोरे यांच्या घरी भेट घेतली. त्याठिकाणी स्नेहभोजन केले. त्यामुळे चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना डॉ. कोरे आपले सुरवातीपासूनचे मित्र आहेत. कोणतेही सरकार असले तरी ते सरकारला सहकार्य करत असतात. गांधी भारत कार्यक्रमासाठी त्यांनी आपल्या संस्थेच्या 170 हून अधिक खोल्या दिल्या आहेत. या ऐतिहासिक कार्यक्रमाला संस्थेकडून सहकार्य करण्यात येत आहे. त्यांचे वडिल स्वातंत्र्यसैनिक होते. स्वातंत्र्य लढ्यात कोरे कुटुंबाने योगदान राहिले आहे, असे उपमुख्यमंत्री शिवकुमार म्हणाले.
मी काँग्रेसमध्ये जाणार नाही. आता या वयात दुसरे लग्न मला कशाला पाहिजेत, अशी मिश्किल प्रतिक्रिया केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांनी पत्रकारांसमोर व्यक्त केली. केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी आज घरी भेट दिली. त्यांच्याशी आपला 40 वर्षांचा संबंध आहे. आपल्या संस्थेने पक्षभेद न करता चांगल्या कामांना नेहमी पाठबळ दिले आहे. मी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला भेट देणार आहे. पण, काँग्रेस मेळाव्यात सहभागी होणार नाही, असेही डॉ. कोरे यांनी सांगितले.