

बंगळूर : जिल्हा आणि तालुका पंचायतींच्या निवडणुका फेब्रुवारीमध्ये होतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिली आहे. 5 डिसेंबरला हासनमध्ये स्वाभिमानी मेळावा होणार असून त्यानंतर बेळगावात भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रविवारी (दि. 1) येथे ते पत्रकारांशी बोलत होते. जिल्हा आणि तालुका पंचायत निवडणुकांमुळे हासनमध्ये मेळावा आयोजित केला आहे का, असे पत्रकारांनी त्यांना विचारले. त्यावेळी त्यांनी एका विशिष्ट उद्देशामुळे मेळाव्यांचे आयोजन केले जाते. आता लवकरच जिल्हा व तालुका पंचायतींच्या निवडणुकात होत आहेत. या मेळाव्यामागे हेही एक कारण आहे. फेब्रुवारीमध्ये निवडणुका होतील, असा अंदाज घेऊन तयारी सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. याआधी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत जिल्हा व तालुका पंचायत निवडणुकांबाबत चर्चा करण्यात आली. आरक्षण जारी करण्यासाठी सरकारने न्यायालयाकडे चार आठवड्यांची मुदत मागितली आहे. त्यानुसार न्यायालयाने जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मुदत दिली असून आरक्षण जारी करण्याची तयारी सुरु आहे. फेब्रुवारीमध्ये निवडणुका घेण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याची माहितीही त्यांनी दिली.
केवळ मतदारसंघांचे आरक्षण जारी करण्यास सव्वातीन वर्षे लागली आहेत. आरक्षण, मतदारसंघ पुनर्रचना अशा विविध कारणांवरुन उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्यावर सुनावणी सुरु आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या सुनावणीवेळी सरकारने आरक्षण जारी करण्यासाठी महिन्याची मुदत मागितली. त्यानुसार मुदत देण्यात आली असून पुढील सुनावणीवेळी याबाबत निकाल लागण्याची शक्यता आहे. आरक्षण व इतर प्रक्रिया पूर्ण करुन फेब्रुवारीमध्ये निवडणुका घेण्याची तयारी सरकारने केली आहे.
हासनमध्ये 5 डिसेंबरला स्वाभिमानी मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याची कल्पना पक्षश्रेष्ठींना दिली आहे. हा मेळावा हासनपुरता आहे का? असे विचारल्यानंतर त्यांनी राज्यभर हा मेळावा पोहोचणार असल्याचे सांगितले. हासननंतर बेळगावात भव्य मेळावा होईल. सोमवारी (दि. 2) याविषयी बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीनंतर सविस्तर माहिती दिली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.