विजापूर : पूर्ववैमनस्यातून दगडाने ठेचून दुहेरी हत्याकांड झाल्याची घटना विजापूर जिल्ह्यातील कन्नूर येथे रविवारी (दि. 12) रात्री घडली. सागर बेलुंगडी (वय 25) आणि इसाक कुरेशी (वय 24) अशी खून झालेल्यांची नावे आहेत. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. पूर्ववैमनस्यातून हे हत्याकांड झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली आहे. त्यापैकी एक संशयित पोलिसांवर दुचाकी घालून पळण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार करत अटक केल्याची माहिती जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी दिली.
अक्षय जुलजुळे, भरत, संजय, संतोष आणि मल्लनगौड अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. अक्षय जुलजुळे याने पोलिसांवर दुचाकी घालून पळण्याचा प्रयत्न केला. यावेळी विजापूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक रायगोंड जनार यांनी हवेत तीन गोळ्या झाडल्या. पण तरीही त्याने पळण्याचा प्रयत्न केल्याने गोळी झाडण्यात आली. त्याच्या उजव्या पायाच्या गुडघ्याखाली गोळी लागली. त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांना न्यायालयासमोर हजर करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास वेगाने सुरू आहे. या प्रकरणाची नोंद विजापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
2023 मध्ये ईरणगौड पाटील यांच्यावर सागर बेलुंगडी आणि इसाक कुरेशी यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात ईरणगौड गंभीर जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच आठ महिन्यांनंतर त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेचा बदला म्हणून ईरणगौड यांचा भाऊ मल्लनगौड आणि त्याच्या मुलांनी सागर आणि इसाक यांचा 12 रोजी रात्री कन्नूर गावात खून केला.