विजापूर : दीपक शिंत्रे
शहरात 14 वर्षाच्या बालिकेवर बलात्कार करून निर्घृण खून केल्याच्या घटनेनंतर विविध दलित संघटना, महिला संघटना व सर्वपक्षीयांतर्फे शनिवारी पुकारण्यात आलेल्या विजापूर जिल्हा बंदला प्रतिसाद मिळाला. शहरासह जिल्ह्यातील व्यवहार बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात आला. बसवर किरकोळ दगडफेक वगळता शांततेत बंद पाळण्यात आला.
सकाळपासूनच शहरातील प्रमुख बाजार पेठ, कापड मार्केट, सराफ बाजार, किराणा बाजार, भाजी मार्केट, सिनेमागृह, हॉटेल, किरकोळ विक्रेत्यांनी आपले व्यवहार बंद ठेवून बंदमध्ये सहभागी झाले होते. बसस्थानकावरुन एकही बस सोडण्यात आली नाही. शहरातील सर्व शाळा, महाविद्यालय, शहर बस वाहतूक सेवाही बंद होती.
शहरवासियांचा उत्स्फूर्त सहभाग
शहरातील विविध भागातून, महिला, मुली, युवक, नागरिक गटा- गटांनी डॉ. आंबेडकर चौकात जमा होत होते. शहरातील प्रमुख भागांसह अनेक गल्ली-बोळात रस्त्यावर टायर पेटवून रास्ता रोको करण्यात आला. शहरातील डॉ. आंबेडकर चौकात झालेल्या निषेध सभेत पीडित बालिकेच्या कुटुंबियांसह, राज्यातून, जिल्ह्यातून आलेले विविध दलित संघटनेचे पदाधिकारी, महिला संघटनेचे व अनेक संघ-संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
एच.डी. भरतकुमार, सुनील सिद्राम शेट्टी, शिवबाळप्पा, सिध्दलिंग बागेवाडी, बाळू जेऊर, रमेश असंगी, जितेंद्र कांबळे, विनायक गुणसागर, अशोक चलवादी आदींनी जिल्हा प्रशासन, पोलिस खात्यावर जोरदार टीका केली.