बेळगुंदी : बेळगुंदी आणि सोनोली या जुळ्या गावातील दोन युवकांना दहा तासांच्या अंतरावर मृत्यूने गाठले. एका युवकाचा वीजधक्क्याने, तर दुसऱ्या युवकाचा सर्पदंशाने करून अंत झाला. करण मोहन पाटील (वय 30, बेळगुंदी, तालुका बेळगाव) आणि मिलिंद प्रभाकर पाटील (वय 30 सोनाली तालुका बेळगाव) अशी मृतांची नावे आहेत. दोन तरुणांचा अपघाती मृत्यू झाल्याने बेळगुंदी-सोनोली परिसरावर शोककळा पसरली आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि.१४) रात्री करण पाटील आपल्या शेतातील घरासमोर काम करत होता. अंधुक प्रकाशात त्याला सर्पदंश झाला. तातडीने त्याने ही माहिती घरच्या लोकांना दिली. त्यानंतर घरच्या लोकांनी तसेच मित्रांनी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र सर्प अतिविषारी असल्यामुळे त्याचा वाटेतच मृत्यू झाला होता. मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास हा प्रकार घडला. करणचे याच वर्षी लग्न झाले होते. त्याच्या पश्चात पत्नी, आई, भाऊ असा परिवार आहे. करण पुण्यात खाजगी कंपनीमध्ये कामाला होता. गेले काही दिवस तो वर्क फ्रॉम होम करत होता. दिवाळीनंतर तो प्रत्यक्ष कामावर हजर होणार होता.
सर्पदंश घटनेच्या काही तास आधी सोनोली गावातील मिलिंद पाटील या पेंटर युवकाचा रंगकाम करताना वीज धक्क्याने मृत्यू झाला. मिलिंद गावातीलच एका घराचे रंगकाम करत होता. या घरासमोरून मुख्य वीज वाहिनी गेली आहे. घराच्या समोरच्या भिंतीला रंगकाम करताना मिलिंदच्या हाताचा स्पर्श मुख्य वीजवाहिनीला झाल्याने तो पहिल्या मजल्यावरून खाली पडला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई वडील भाऊ बहीण असा परिवार आहे. घटनास्थळी पोलीस आणि हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पंचनामा केला. दोन्ही युवकांच्या मृतदेहांवर बुधवारी अंत्यसंस्कार होणार आहेत.