Chandgad Tudye Village Protest
चंदगड : बेळगाव तालुक्याच्या हद्दीजवळील तुडये (ता. चंदगड ) मधून बेळगावला ये - जा करण्यासाठी दिवसातून दोनच बस फेऱ्या आहेत, यात वाढ करून दुपारच्या कालावधीत किमान जादा तीन बस फेऱ्या सुरू कराव्यात, या मागणीसाठी (दि. 8) पासून तुडये येथे साखळी उपोषण सुरू आहे. याकडे कर्नाटक आगाराचे दुर्लक्ष होत आहे. तुडयेच्या अलीकडे धामणे एस (ता. बेळगाव) या गावाला महाराष्ट्र सरकार वीज पुरवठा करते, तसेच महाराष्ट्र हद्दीत राकसकोप धरणाचा जलसाठा करून तो बेळगाव शहराला पुरवठा करण्यात येतो, मग आमच्या गावाला बेळगाव आगार पुरेशी बस सुविधा का देत नाही, असा सवाल करत मंगळवारी (दि. १3) वेंगुर्ला ते बेळगाव राज्यमार्गावर शिनोळी येथे कर्नाटक राज्य हद्दीवर रास्ता रोको करण्याचा निर्णय आंदोलकानी घेतला.
तुडये (ता. चंदगड) येथे ग्रामपंचायत च्या पुढाकाराने दि. 8 पासून सुरू असलेल्या साखळी उपोषणाला सोमवारी (दि. 12 ) तहसीलदार राजेश चव्हाण, चंदगड आगार व्यवस्थापक सतीश पाटील, जि. प. चे माजी शिक्षण सभापती भरमाना गावडा, शिवसेना ठाकरे गटाचे प्रभाकर खांडेकर, प्रताप पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन बल्लाळ, संजय गांधी निराधार योजनेचे लक्ष्मण गावडे, तालुका पंचायत माजी सभापती जगन्नाथ हुलजी, शांताराम पाटील यांनी भेट दिली.
चंदगड आगार व्यवस्थापक सतीश पाटील यांनी बेळगाव आगार प्रमुखांना मोबाईलद्वारे संपर्क साधला, मात्र त्यांनीही जादा बस फेऱ्या वाढवण्यासाठी असमर्थता दर्शवली. यामुळे ग्रामस्थ आता संतापले असून रास्ता रोको आंदोलन होणार आहे.
सरपंच विलास सुतार म्हणाले, बेळगाव तालुक्यातील धामणे एस या गावाला महाराष्ट्र वीज महामंडळ वीज पुरवठा करते, तर बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयाचा संपूर्ण साठा हा महाराष्ट्राच्या हद्दीत आहे. त्यामुळे बेळगाव आगाराने आम्हाला पुरेशी बस सुविधा द्यावी. यामुळे मंगळवारी रास्ता रोको करत आहे या पुढील काळात तीव्र आंदोलन करून राकसकोप धरणाच्या महाराष्ट्र हद्दीतील जलसाठ्यामध्ये जलसमाधी घेऊ असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी उपसरपंच अशोक पाटील, सदस्य मारुती पाटील, प्रा. डॉ. व्यंकू कोलकार, दिलीप हुलजी, प्रियंका जाझरी, मनोहर कनगुटकर, सविता हुलजी, सविता गिरी, प्रिया राव, रेश्मा सुतार, वनिता गुरव, तंटामुक्त कमिटी अध्यक्ष के. एस. पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील, हर्षवर्धन कोळसेकर, अरुण पाटील रघुनाथ पाटील, गणपती कोरजकर भिकाजी पाटील कलापा हुलजी, गणपत कनगुटकर, पांडुरंग चव्हाण चंद्रकांत सुतार, यल्लाप्पा लोहार, राजाराम पाटील आदी शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.
तुडये हे गाव चंदगड तालुक्यामध्ये असले तरी फक्त कागदोपत्री व्यवहार सोडले तर रोटी बेटीचे, शैक्षणिक, सर्व व्यापार, सर्व व्यवहार हे बेळगावशीच आहेत. यापूर्वी बेळगाव आगाराच्या बस फेऱ्या सुरू होत्या. मात्र काही कारणास्तव बेळगाव आगाराने सदर बस फेऱ्या बंद केल्या आहेत. याचा फटका तुडये, हाजगोळी, धामणे एस या गावांना बसला आहे. राकसकोप येथे येणाऱ्या बस फेऱ्या पुढे 3 किमी वाढवून तुडये पर्यंत सुरु ठेवा, अशी मागणी होत आहे. याकडे दुर्लक्ष झाले आहे.