

बंगळूर : बेळगाव-धारवाड आणि कुडची-बागलकोट रेल्वे मार्गांचे काम तातडीने पूर्ण करावे. तसेच राज्यातील रखडलेल्या इतर रेल्वे प्रकल्पांचे कामही युद्धपातळीवर हाती घ्यावे, असे आदेश रेल्वे पायाभूत सुविधा विकास मंडळाला मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले आहेत.
राज्यातील पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांबाबत सोमवारी (दि. 29) वरिष्ठ अधिकारी आणि मंत्र्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी विकास आढावा बैठक घेतली. यावेळी तेे म्हणाले, तुमकुर-दावणगिरी, बेलूर-हासन आणि शिमोगा-राणेबेन्नूर रेल्वे मार्गांचे बांधकाम दिलेल्या वेळेत पूर्ण करण्यात यावे. रेल्वे प्रकल्पांच्या कामासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनासारख्या सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण कराव्यात.
राज्यातील सर्व मंजूर रेल्वे प्रकल्पांना 16 हजार 554 एकर जमीन आवश्यक आहे. यापैकी 84 टक्के जमीन यापूर्वी संपादित करण्यात आली आहे. अंदाजे 2 हजार 685 एकर जमीन अद्याप संपादित करायची आहे. राज्य सरकारने 2 हजार 581.67 कोटी रुपये आणि भूसंपादन प्रक्रियेसाठी 2 हजार 950.22 कोटी रुपये जारी केले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली. राज्यातील एकूण 6 विमानतळ अंमलबजावणीच्या विविध टप्प्यात आहेत. हासन विमानतळ भूसंपादन भरपाई शेतकऱ्यांना लवकरात लवकर वितरित करावी. सर्व विमानतळांची कामे पूर्ण करण्यासाठी सर्व तांत्रिक अडथळे दूर करावेत, असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले.