

बेळगाव : शेतकऱ्यांच्या जमिनी विविध प्रकल्पासाठी संपादित केल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना न्यायालयाने नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशानंतरही एक वर्ष उलटले तरी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यास टाळाटाळ केली. यामुळे न्यायालयाने जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे वाहन जप्त करण्याचा आदेश दिला होता. त्या आदेशानुसार जिल्हा पंचायत अधिकाऱ्यांचे वाहन गुरुवारी (दि. 8) जप्त करण्यात आले.
बैलहोंगल तालुक्यातील कुलवळ्ळी गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी सरकारने विविध प्रकल्पासाठी संपादित केल्या आहेत. एकूण 21 एकर अतिरिक्त जमीन संपादित करून त्या जागेत सरकारी कार्यालये उभारून 1992-93 पर्यंत मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या. मात्र, ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या त्यांना नुकसान भरपाई देण्यात आली नाही.
शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईसाठी न्यायालयात धाव घेतली. तेव्हा बैलहोंगल न्यायालयाने प्रतिएकर 4 लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले होते. मात्र सहा वर्ष उलटले तरी भरपाई दिली नाही. त्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांनी न्यायालयासमोर आपली बाजू मांडली. त्या ठिकाणी न्यायालयाने जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांचे वाहन तसेच कार्यालयातील संगणक आणि इतर वस्तू जप्त केल्या असे सरकारी वकील मिसाळे यांनी सांगितले. यावेळी पीडित शेतकरी महेंद्र रावसाहेब देसाई यांनी सांगितले की, 1989 मध्ये 21 एकर जमीन घेतली होती. यापैकी 5 एकर जमिनीची भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.पीडितांना 90 लाखांपेक्षा जास्त भरपाई देणे बाकी आहे. त्यामुळेच न्यायालयाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या वाहनासह इतर वस्तू जप्त करण्याचे आदेश दिले असल्याचे त्यांनी सांगितले.