खानापूर : खानापूर तालुक्यातील जळगे येथील मलप्रभा नदीच्या काठावर असलेल्या शिवारात शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत सुमारे 900 टन ऊस जळून खाक झाल्याची घटना सोमवार (दि. 29) घडली. या आगीत परिसरातील 15 शेतकऱ्यांचे 40 लाख रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
मुबलक पाण्याची सोय असल्याने जळगे येथील नदी काठावरील शिवारात मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादन घेतले जाते. तोडणीसाठी टोळ्या न मिळाल्याने एकाही शेतकऱ्याचा ऊस कारखान्याला गेलेला नाही. भागातील शेती पंपांना विद्युत पुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मरजवळ खाली आलेल्या वीज वाहिनीला शॉर्टसर्किट झाल्याने अचानक ठिणगी पडली. त्यातून सुकलेल्या उसाला आग लागली. काही क्षणातच आग सर्वत्र पसरली. जोरदार वाऱ्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले. काही वेळातच आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे ऊस पीक आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र शेतजमीन ओली असल्याने अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी वेळेत पोहोचू शकली नाही. परिणामी, आग विझवण्यास उशीर झाल्याने तोडणीला आलेला सुमारे 900 टन टन ऊस पूर्णतः जळून खाक झाला. दुर्घटनेत मालोजी पाटील, सदानंद पाटील, व्यंकट पाटील, निंगाप्पा पाटील, नारायण पाटील, शामराव पाटील, चंद्रकांत पाटील, राजाराम पाटील, बाजीराव पाटील, महेश पाटील, विठ्ठल पाटील, बबन गुरव, महादेव गुरव, बाळू गुरव, परशराम गुरव, तुकाराम गुरव, शिवाजी गुरव, नारायण गुरव, परशराम लाड, सुनील लाड, भरमाणी लाड, नामदेव लाड, मारुती लाड, विठ्ठल लाड, नामदेव गुरव या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून वर्षभराची मेहनत वाया गेल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. जळगे येथील शेतकऱ्यांचे ऊस हे प्रमुख उत्पन्नाचे साधन असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.