

घनसावंगी : घनसावंगी तालुक्यातील मुद्रेगाव येथे दिपाली सुदर्शन राऊत यांच्या शेतातून जाणाऱ्या 33 केव्ही क्षमतेच्या उच्चदाब वीजवाहिनीचा पोल अचानक कोसळल्याने शार्टसर्कीट होउन दोन एकर ऊस जळाला. या आगीत 7 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
मुद्रेगाव येथे 33 केव्ही क्षमतेच्या उच्चदाब वीज वाहिनीचा पोल अचानक ऊसाच्या शेतात कोसळल्याने उच्चदाब तारेतून ठिणग्या उडाल्या. यामुळे ऊसाने क्षणार्धात पेट घेतला. वाऱ्यामुळे आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले.
या आगीत दोन एकर ऊस जळून खाक झाला.आगीत एक लिंबाचे झाड, 11 नग पाईप, ठिबक सिंचन संच तसेच इतर शेती साहित्यही नष्ट झाले आहे. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
सुरक्षेच्या उपाययोजना राबवा
वीज पोल कोसळणे, तारा तुटणे अशा घटना तालुक्यातील ग्रामीण भागात वारंवार घडत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे महावितरणने वेळेवर देखभाल-दुरुस्ती करून सुरक्षिततेच्या उपाययोजना राबवाव्यात, अन्यथा अशा घटना पुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.