बेळगाव ः साखर कारखान्यात बॉयलरचा स्फोट होऊन दोन कामगार जागीच ठार झाले तर सहाजण गंभीर जखमी झाले. बैलहोंगल तालुक्यातील मुरकुंबी येथील इनामदार शुगर्स लिमिटेड या कारखान्यात बुधवारी दुपारी ही घटना घडली. इनामदार शुगर्समध्ये ऊस गाळप सुरू असताना एका बॉयलरमध्ये उसाचा रस गरम होत होता. दुपारी दीडच्या सुमारास अचानक या बॉयलरचा स्फोट झाला. यामध्ये तिघेजण ठार झाले. उर्वरित पाचजण गंभीर जखमी झाले आहेत.
मृतांमध्ये अक्षय सुभाष चोपडे (वय 48, रा. चावडी गल्ली, रबकवी, ता. रबकवी-बनहट्टी), सुदर्शन महादेव बनोशी (वय 25, रा. चिक्कमुनवळ्ळी, ता. खानापूर) व दीपक नागाप्पा मुनवळ्ळी (वय 32, रा. नेसरगी, ता. बैलहोंगल) यांचा समावेश आहे. अक्षय यांचा मृत्यू बैलहोंगल सरकारी रुग्णालयात झाला तर उर्वरित दोघांना खासगी हॉस्पिटलमध्ये आणले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. जखमींमध्ये मंजुनाथ गोपाल तेरदाळे (वय 31, रा. हुलीकट्टी, ता. अथणी), राघवेंद्र मल्लाप्पा गिरीयाळ (वय 36, रा. गिरीहोसूर, ता. गोकाक), गुरूपादप्पा बिराप्पा तम्मण्णवर (वय 38, रा. मरेगुद्दी, ता. जमखंडी), भरतेश बसाप्पा सारवाडी (वय 27, रा. गोडचीनमलकी) व मंजुनाथ मडीवाळप्पा काजगार (वय 28, रा. अडहळ्ळी, ता. बैलहोंगल) यांचा समावेश आहे. या सर्वांवर केएलई रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तेदेखील गंभीर भाजल्याचे पोलिसांनी सांगितले.