

Inamdar Sugars Factory Boiler Explosion
बेळगाव : इनामदार शुगर्स लिमिटेड या साखर कारखान्यात बॉयलरचा स्फ़ोट होऊन दोन कामगार जागीच ठार झाले. तर सहा जण गंभीर भाजल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील मरकुंबी गावातील साखर कारखान्यात ही दुर्दैवी घटना बुधवारी (दि.७) दुपारी घडली.
साखर कारखान्यात सध्या गळीत हंगाम सुरु आहे. नेहमी प्रमाणे गळीताचे काम सुरु असताना दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास बॉयलरचा स्फ़ोट झाला आणि गरम पदार्थ अंगावर पडल्याने दोन कामगारांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. तर सहा जण गंभीर जखमी झाले. जखमीपैकी एकाला बैलहोंगल येथील सरकारी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.
अन्य जखमीना झिरो ट्रॅफिक व्यवस्था करून तातडीने बेळगावच्या के एल इ इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. घटनेचे वृत्त कळताच पोलीस आणि कामगार खात्याच्या अधिकाऱ्यांनी साखर कारखान्याला भेट दिली. बेळगावचे जिल्हा पोलीस प्रमुख के. रामराजन यांनी के एल इ इस्पितळाला भेट देऊन महिती घेतली.या घटनेची नोंद मुरगोड पोलीस स्थानकात झाली आहे.