रावसाहेब पाटील यांचे निधन  रावसाहेब पाटील
बेळगाव

बेळगाव : द. भा. जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांचे निधन

पुढारी वृत्तसेवा

निपाणी : पुढारी वृत्तसेवा

बोरगाव परिसराचे भाग्यविधाते, अरिहंत उद्योग समूहाचे संस्थापक, दक्षिण भारत जैनसभेचे अध्यक्ष, सहकारत्न रावसाहेब अण्णासाहेब पाटील (वय ८२) यांचे आज (मंगळवार) सकाळी १० वाजून ४० मिनिटांनी निधन झाले. त्यांच्या निधनाने निपाणी तालुक्यासह बोरगाव परिसरात शोककळा पसरली आहे.

सहकाररत्न रावसाहेब पाटील यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांना बेळगाव येथील अरिहंत हॉस्पिटलमध्ये उचारासाठी दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू असतांना काही काळ त्यांनी प्रतिसाद दिला होता. पण सोमवारपासून उपचाराला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे मंगळवारी सकाळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी निपाणी मतदारसंघात पसरली. त्यामुळे पाटील यांच्यासह अरिहंत परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे कार्यकर्ते, उत्तम पाटील प्रेमी, उत्तम पाटील युवा मंचसह नागरिक, अरिहंत परिवाराचे सदस्य शोकाकुल बनले. रावसाहेब पाटील यांनी जैन समाजासह इतर समाजासाठी विविध क्षेत्रात मोठे काम केले होते. त्यांनी दक्षिण भारत जैनसभेत मोठे योगदान दिले आहे.

सध्या ते अध्यक्ष पदावर कार्यरत होते. आजपर्यंत समाजासाठी दक्षिण भारत जैनसभेच्या माध्यमातून भरीव काम केले होते. शैक्षणिक, धार्मिक, सहकार, कृषी क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले होते. याशिवाय अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून अरिहंत क्रेडिट सौहार्द संस्था, अरिहंत जवळी गिरणी, आर. ए. पाटील कॉन्व्हेंट, प्राथमिक, माध्यमिक शाळा, बोरगाव पिकेपीएस, अरिहंत दूध डेअरी 'अरिहंत शुगर्स'च्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक, बेरोजगार, ऊस उत्पादक, दूध उत्पादक शेतकऱ्यासाठी भरीव कार्य केले होते. सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुखाशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. त्यामुळे ते आजाद शत्रू म्हणून ओळखले जात होते.

विशेषतः कोरोना, वादळी वारे, अतिवृष्टी, आणि महापूर काळात संकटात सापडलेल्या नागरिकांना मोफत रुग्णवाहिका, घरांचे छप्पर, जीवनावश्यक वस्तू देऊन सामाजिक बांधिलकी त्यांनी जोपासली होती.

अलीकडच्या काळात अरिहंत सौहार्द संस्था मल्टीस्टेट करून कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात शाखांचा विस्तार केला होता. यापूर्वीच ते लोकप्रतिनिधी बनले असते. पण राजकारण न करता समाजकारणाला त्यांनी महत्त्व दिले होते. बेळगाव येथून त्यांचा मृतदेह मंगळवारी बोरगाव येथे दुपारी आणला जाणार आहे. त्यानंतर बोरगाव शहरातून अंत्ययात्रा काढण्या येणार आहे. त्यानंतर कोल्हापूर रोडवरील अरिहंत मराठी शाळा येथे दुपारी ४ वा. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी मिनाक्षी, मुले अरिहंत उद्योगसमुहाचे कार्याध्यक्ष अभिनंदन पाटील, युवा नेते सहकाररत्न उत्तम पाटील, विवाहित मुलगी दिपाली, सुना विनयश्री, धनश्री, नातवंडे, जावई असा परिवार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT