बेळगाव : शहर पोलिसांनी गांजा विक्री करणार्यांविरोधात जोरदार मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. रविवारी (दि. 22) माळमारुती, मार्केट आणि बेळगाव ग्रामीण पोलिसांनी केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत पाचजणांना अटक करुन 1 लाख 30 हजार 90 रुपयांचा गांजा जप्त केला आहे.
माळमारुती पोलिसांनी दोन ठिकाणी छापा टाकून दोघांना अटक केली. त्यांच्याकडून 51 हजार रुपये किमतीचा 2 किलो 527 ग्राम गांजा जप्त केला आहे. शिवबसवनगरमधील पॉलिटेक्निकजवळील जुन्या रस्त्याजवळ अमलीपदार्थांची विक्री करत असलेला संशयित धीरज श्रीनिवास चौगले (रा. गँगवाडी) याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.
मात्र, संशयिताने आपल्याकडील गांजा टाकून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण, त्याला पकडून 26 हजार रुपये किमतीचा 1 किलो 314 ग्रॅम गांजा जप्त केला. त्यानंतर धर्मनाथ भवनच्या मागे गांजाची विक्री करताना कुलकुले उर्फ भोलेनाथ दादा चौगले (रा. गँगवाडी) याला अटक करुन त्याच्याकडून 25 हजार रुपये किंमतीचा 1 किलो 213 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. पोलिस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक होनप्पा तलवार आणि त्यांच्या सहकार्यांनी ही कारवाई केली आहे. त्यांच्याविरोधात एनडीपीएस अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
मार्केट पोलिसांननी भरतेश शाळेसमोर सार्वजनिक ठिकाणी अमलीपदार्थांची विक्री करत असताना उमेश सुरेश उरबिनट्टी (रा. अक्कतंगेहाळ, जि. बेळगाव) याला अटक केली आहे. त्याच्याकडून 20 हजार रुपये किमतीचा 627 ग्रॅम गांजा, रोख 4,090 रुपये, एक मोबाईल आणि इतर वस्तू असा एकूण 26,340 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बेळगाव ग्रामीण पोलिसांनी पिरनवाडीतील जनता प्लॉटजवळ अमलीपदार्थांची विक्री करत असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक आदित्य राजन यांना मिळाली.
त्यांनी सहकार्यांसह छापा टाकून वर्धन अनंत कांबळे, पार्थ रमेश गोवेकर (दोघेही रा. सिद्धेश्वर गल्ली, पिरनवाडी) यांना अटक केली. त्यांच्याकडून 6 हजार 800 रुपये किमतीचा 580 ग्रॅम गांजा जप्त केला. त्यांच्याविरोधात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.