

बेळगाव : शाळा-कॉलेजचे विद्यार्थी हेरून त्यांना गांजा विकणारे आणि स्वतः गांजाचे सेवन करणार्या पाच जणांच्या टोळीला टिळकवाडी पोलिसांनी अटक केली.
विनायक प्रकाश कोल्हापुरे (वय 29, रा. अयोध्यानगर, तिसरा क्रॉस), संदेश शीतल गवळी (24, रा. अयोध्यानगर, तिसरा क्रॉस), कुमार गोविंद पुजारी (वय 39), रोहित शंकर मुळवे (वय 30) व सौरभ श्रीधर सतुस्कर (वय 22, तिघे रा. भवानीनगर, बेळगाव) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
या पाच तरुणांनी भवानीनगर, मंडोळी रोड, गोडसेवाडी व टिळकवाडी परिसरात आपली दहशत निर्माण केली होती. हे सर्वजण शाळा व कॉलेजचे विद्यार्थी हेरून त्यांना आधी गांजाची सवय लावत होते. गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांच्याकडून हा प्रकार सुरू होता. ही माहिती टिळकवाडीचे निरीक्षक परशुराम पुजेरी यांना मिळाली. त्यांनी सहकार्यांसह अयोध्यानगर येथील
गोडसेवाडीजवळील पहिल्या क्रॉस येथे सापळा रचला. यावेळी उपरोक्त संशयित रंगेहाथ सापडले. त्यांच्याकडे 14 हजार रूपये किंमतीचा 494 ग्रॅम गांजा सापडला. शिवाय दोन लाखाची झेन कार, चौघांचे मोबाईल व 2500 रूपयांची रोख रक्कम जप्त केले. त्यांना अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता त्यांची हिंडलगा कारागृहात रवानगी केली. निरीक्षक पुजारी व त्यांच्या टीमच्या या कारवाईचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी कौतुक केले आहे.