

बेळगाव : पुस्तिकेचे प्रकाशन करताना खासदार जगदीश शेट्टर, सीईओ राहुल शिंदे, लीड बँक व्यवस्थापक प्रशांत घोडके आदी.
बेळगाव : सर्वांना बँकांच्या सुविधांचा लाभ मिळावा यासाठी लीड बँकेच्या सर्व सदस्य बँकांनी शाखा उघडण्याचे अर्ज तातडीने निकालात काढावेत. सरकार प्रायोजित योजनांसाठी लाभार्थ्यांनी केलेल्या कर्ज अर्जांवर जलदगतीने कार्यवाही करावी, असे आदेश खासदार जगदीश शेट्टर यांनी दिले.
डीसीसी-डीएलआरसीची चौथी त्रैमासिक बैठक गुरुवारी (दि. 19) जिल्हा पंचायत सभागृहात आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी लीड बँक व्यवस्थापक प्रशांत घोडके यांनी स्वागत केले. बैठकीत 2025-26 या वर्षातील लीड बँकेची वार्षिक क्रेडिट प्लॅन पुस्तिका प्रकाशित करण्यात आली.
जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी सरकार पुरस्कृत प्रकल्पांसाठी करण्यात आलेले अर्ज निर्धारित वेळेत निकाली काढण्याचे निर्देश दिले. तसेच ऊस तोडणी यंत्रासाठी आलेले कर्ज प्रस्ताव निर्धारित वेळेत मंजूर केल्याबद्दल बँकांचे कौतुक केले. कृषी सहसंचालक एच. डी. कोळेकर यांनी बेळगाव जिल्ह्याने कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेत राज्यात चौथे स्थान आणि एफएमएफएमई योजनेत प्रथम स्थान मिळवल्याची माहिती दिली.
रिझर्व्ह बँकेचे सहाय्यक सरव्यवस्थापक प्रभाकरन यांनी आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांमधील अलीकडच्या बदलांची माहिती दिली. नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक अभिनव यादव यांनी नाबार्डच्या नवीन प्रकल्पांबद्दल माहिती दिली.
जन सुरक्षा योजनेंंतर्गत पीएमजेजेबी योजना आणि पीएमएसबी योजनेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल कॅनरा बँक, कर्नाटक ग्रामीण बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया यांना पुरस्कार देण्यात आला. बैठकीला सर्व बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.