Crime News pudhari photo
बेळगाव

Belgaon News | बेकायदेशीर धंदे; 'आवाज' दाबणारच....!

शहर पोलिसांचा निर्धार; जिमखाना गोळीबारानंतर अधिकच सजगता

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : मटका, जुगार, अमली पदार्थ बेकायदेशीर धंद्यांना कितीही चाप लावण्याचा प्रयत्न केला तरी ते कसे ना कसे डोके वर काढतातच, गेल्या सव्वा वर्षांपासून पोलिस आयुक्त भूषण बोरसे यावर नियंत्रण आणण्याचा अटोकाट प्रयत्न करीत आहेत. तरीही काही ठिकाणी ते सुरू असल्याने ते अधिकच गंभीर बनले असून कारवाईच्या सक्त सूचना दिल्या आहेत. युनियन जिमखाना गोळीबार प्रकरणानंतर तर पोलिस खाते अधिकच सजग बनल्याचे दिसून येत आहे.

मटका घेणारे व जुगार बसविणाऱ्या एकाच्या मुसक्या आवळल्या तर काही दिवसांत नवीन पंटर तयार होतो. त्याला आवरेपर्यंत तिसरा पुढे येतो. त्यामुळे, या बेकायदेशीर धंद्यांवर कायमस्वरुपी निर्बंध घालणे पोलिस खात्यासमोर आव्हान बनले आहे. दोन दशकांपूर्वी बेळगावात मटका व जुगार बसविणाऱ्यांमध्ये मातब्बर व्यक्तींचा हात असायचा. पोलिस खात्याला हाताशी धरुन त्यांचे धंदे बिनदिक्तपणे चालायचे. त्यांच्या माघारी त्यांचे चेले तयार झाले असले तरी त्यांच्यात ताळमेळ राहिलेला नाही. त्यामुळे, अमूक हा मटकाकिंग अथवा जुगार किंग असा कुणीही राहिलेला नाही. परिणामी प्रत्येकजण स्वतःचा स्वतंत्र अड्डा तयार करु पाहत आहे. यामुळेच पोलिसांची डोकेदुखी अधिक वाढली आहे.

इर्षेतून गोळीबार

काही दिवसांपूर्वी युनियन जिमखाना येथे गोळीबाराची घटना घडली. यातील मुख्य संशयित प्रफुल्ल पाटील हा अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. परंतु, हा सर्व वाद जुगाराच्या वर्चस्ववादातून असल्याचे लपून राहिलेले नाही. या घटनेचा निकाल लागेल तेव्हा लागेल. परंतु, तेव्हापासून शहर परिसरातील पोलीस यंत्रणा मात्र सतर्क बनली आहे. कुठे जुगार, मटका सुरू असेल तर तातडीने कारवाई केली जात आहे. कारण, पोलिस आयुक्तांच्या रोषाला आपल्याला सामोरे जावे लागू नये, याची काळजी प्रत्येक ठाण्यातील पोलिस अधिकारी घेत आहेत. गांजा व अन्य अमली पदार्थाच्या बाबतीतही पोलिस यंत्रणा सतर्क बनली आहे.

मद्यप्राशन अन् आवाजावर मर्यादा

एकीकडे अमली पदार्थावर कारवाई सुरु असताना सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्यांनाही पोलिसांकडून लक्ष्य केले जात आहे. कारण, दंगा येथूनच सुरू होतो, हे पोलिस खात्याला चांगले ठाऊक आहे. त्यामुळेच, उद्यान, पडक्या इमारती, अंधारमय गल्ली-बोळ व सुनसान रस्त्याच्या ठिकाणी कुणी मद्यपान करत बसलेला असल्यास पोलिसांकडून त्याच्यावर कारवाई केली जात आहे. इतकेच नव्हे तर येनकेन कारणामुळे कर्णकर्कश आवाजात साऊंड सिस्टिम लावून धिंगाणा घालणाऱ्यांवरही पोलिसांनी करडी नजर ठेवली आहे. गरज असेल तर कमी डेसिबलचे साऊंडबॉक्स लावण्यास पोलिस खात्याची हरकत नाही. परंतु, मोठ्याने व कर्णकर्कश आवाजात साउंड सिस्टिम लावणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा पोलिस खात्याने दिला आहे.

अडीच महिन्यांतील कारवाईची आकडेवारी

गेल्या अडीच महिन्यांतील कारवाईची आकडेवारीही पोलिस आयुक्तालयाने दोन दिवसांपूर्वी जाहीर केली आहे. बेकायदेशीर धंदे करणारे व समाजकंटकांना चाप बसावा हेच यामागचे कारण आहे. यावरुन बेकायदेशीर धंदे अन् साऊंड सिस्टिमचा आवाज दाबला जाईल, असा विश्वास पोलिस खात्याला वाटतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT