चिकोडी : मोरारजी देसाई निवासी शाळेतील 77 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असून, त्यांच्यावर चिकोडी आणि बेळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विषबाधा पाण्यातून झाली की सकाळी नाश्यात खालेल्या उपिटातून हे स्पष्ट झालेले नाही. या प्रकाराने राज्यभर खळबळ माजली असून, अत्यवस्थ मुलांची आमदार प्रकाश हुक्केरींनी भेट घेतली आहे. आरोग्यमंत्री दोन दिवसांत चिकोडीला भेट देण्याची शक्यता आहे. बहुतेक मुलांची प्रकृती धोक्याबाहेर आहे; मात्र एका विद्यार्थ्याला बेळगावला हलवण्यात आले आहे.
तालुक्यातील हिरेकोडी येथील मोरारजी देसाई निवासी शाळेत 400 विद्यार्थी शिकतात. शुक्रवारी सकाळी 9 वाजण्याच्या दरम्यान उपीट खाल्ल्यानंतर मुलांना उलटी, जुलाब, पोटदुखी सुरू झाले. तसेच ताप आला. त्यामुळे तातडीने घटनास्थळी आरोग्य पथक दाखल झाले, प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर 70 विद्यार्थ्यांना चिकोडी तालुका सरकारी हॉस्पिटलमध्ये व 7 विद्यार्थ्यांना माता-शिशू हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. एका विद्यार्थ्यांची स्थिती गंभीर असल्याने अधिक उपचारासाठी बेळगाव येथील बिम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. उपचारानंतर सर्व मुलांची स्थिती स्थिर असल्याचे आरोग्य खात्याने सांगितले आहे.
घटनेची माहिती मिळताच चिकोडी तालुका सरकारी हॉस्पिटल व मोरारजी देसाई शाळेला आमदार प्रकाश हुक्केरी यांनी भेट देऊन अस्वस्थ मुलांची विचारपूस केली. डॉक्टरांकडून माहिती घेतली. तसेच सर्व रुग्णावर योग्य उपचार करण्याच्या सूचना केल्या.
ड़ॉ. कोरेना फोन : घटनास्थळवरून आमदार हुक्केरी यांनी केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांच्याशी फोनवरून संपर्क साधून केएलई हॉस्पिटलचे तज्ञ डॉक्टर व रुग्णवाहिका पाठवून देण्याची मागणी केली.
जागा अपुरी : अस्वस्थ झालेल्या मुलांना चिकोडी तालुका हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. मात्र हॉस्पिटलमध्ये अपुर्या बेडमुळे अनेक मुलांना जमिनीवर झोपवून सलाईन लावण्यात आले. अनेक लहान चिमुकले रडत असल्याचे दृश्य पाहून उपस्थित अधिकारी व पत्रकारांचे डोळे पाणावले.
मोरारजी निवासी शाळेत झालेल्या या घटनेमुळे शाळेसह चिकोडी सरकारी दवाखान्यात पालकांसह, अधिकारी कर्मचारी, नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. आपल्या मुलांची परिस्थिती पाहून पालक भयभीत झाल्याचे पहावयास मिळाले.
आ. प्रकाश हुक्केरी यांनी तालुका आरोग्याधिकारी डॉ. सुकुमार भागाई यांना धारेवर धरत तुम्ही कुठे होता, काल काय करत होता अशी विचारणा केली. चिकोडी डीवायएसपी गोपालकृष्ण गौडर, डीडीपीआय सीताराम, तहसीलदार राजेश बुर्ली यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
खासगी डॉक्टर : चिकोडी सरकारी दवाखान्यासह माता-शिशू हॉस्पिटलमध्ये मुलांना दाखल केल्यानंतर सरकारी दवाखान्यांमध्ये बालरोग तज्ञ नसल्याने शहरातील खासगी बालरोग तज्ञ डॉ. पार्श्वनाथ जैन व डॉ. मगदूम यांना बोलावून घेण्यात आले. तसेच माता-शिशू हॉस्पिटलमधील कपूर येथील सरकारी बालरोग तज्ञ यांना पाचारण करण्यात आले.
हिरेकोडीत यापूर्वी एका लग्न समारंभात जेवण केल्यानंतर आठशेहून अधिक लोकांना विषबाधा झाली होती. त्यानंतर पुन्हा याच गावातील सरकारी शाळेमध्ये 77 मुले अस्वस्थ झाली. अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडविण्यात याची खबरदारी घेण्याची गरज आहे.
घटनेमुळे कर्नाटकाचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडूराव दोन दिवसांत चिकोडीला येणार असून, शाळेला भेट देणार असल्याची माहिती आ. हुक्केरींनी दिली.
शुक्रवारी सकाळी उपीट खाल्ल्यानंतर मुले अस्वस्थ झाली असा प्राथमिक अंदाज आहे. पण, विषबाधा अन्नातून झाली की पाण्यामुळे हे कळू शकले नाही. घटनेनंतर जिल्हा सर्वेक्षण अधिकारी व जिल्हा आरआरटी पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाण्याचे व जेवणाचे नमुने घेतले आहेत. विभागीय आहार प्रयोगालयात चाचणी करून अहवाल आल्यानंतर विषबाधा कशामुळे झाली हे कळणार आहे.