बेळगाव : वेगा हेल्मेट कंपनीने सात कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकवला आहे. त्यामुळे, त्यांना तीन नोटिसा देण्यात आल्या असून आता शेवटची नोटीस बजावण्यात यावी. त्यानंतरही मुदतीत कर भरला नाही तर मालमत्ता जप्तीची कारवाई करावी, अशा सूचना मंगळवारी (दि. 17) महापालिका सभागृहात झालेल्या सर्वसाधारण सभेत करण्यात आल्या. महापौर मंगेश पवार अध्यक्षस्थानी होते.
बैठक सुरू होताच वेगा हेल्मेट कंपनीचा विषय उपस्थित झाला. मोठी रक्कम थकीत असतानाही वेगा हेल्मेट कंपनीवर कारवाई का केलेली नाही, असा जाब नगरसेवकांनी अधिकार्यांना विचारला. त्यावर महसूल उपायुक्त रेश्मा तालिकोटी म्हणाल्या, थकीत कर जमा करावा, यासाठी कंपनीला आतापर्यंत तीन नोटिसा दिल्या आहेत. शेवटच्या नोटिशीची मुदत बुधवारी (दि. 18) संपणार आहे. त्यानंतर पुन्हा 24 तासांची नोटीस देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. शेवटच्या मुदतीतही थकीत कर भरला नाही तर कंपनीची मालमत्ता जप्त करावी, अशा सूचना करण्यात आल्या.
आमदार राजू सेट आणि नगरसेवक शाहिदखान पठाण यांनी मालमत्ता जप्त करून हा विषय संपणार नाही. महापालिकेला कर जमा करायचा आहे. त्यामुळे, कंपनीशी बोलून तोडगा काढता येतो का पाहावा. वन टाईम सेटलमेंटची तरतूद असेल तर त्याचाही विचार करावा, अशा सूचना केल्या. त्यावर अधिकार्यांनी सेटलमेंटच्या कोणत्याही तरतुदी नाहीत, असे सांगितले. त्यामुळे, दोन दिवसांत वेगा हेल्मेट कंपनीचा थकीत कर जमा होणार की महापालिका मालमत्ता जप्त करणार हे पाहावे लागणार आहे.
सभेत टिळकवाडी क्लबचा ताबा घेण्याचा विषयही चर्चेत आला. टिळकवाडी क्लबचा कर थकलेला आहे. नियमांचे उल्लंघन झाले आहे. असे असताना त्यांना नोटीस बजावल्यानंतर न्यायालयात कॅव्हेट न घातल्यामुळे क्लबने स्थगिती आदेश मिळवला आहे. कायदा सल्लागारांच्या दुर्लक्षामुळे ही कारवाई टळली आहे, असा आरोप नगरसेवकांनी केला.
ले-आऊटप्रकरणी बेकायदा 14 पीआयडी देण्यात आले आहेत. याबाबत सातजणांवर टिळकवाडी पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे; मात्र एफआरआय दाखल झालेला नाही. सातही अधिकार्यांची चौकशी करण्यात येत आहे; पण जागा मालकावरही गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी मागणी नगरसेवक रवी धोत्रे यांनी केली. त्यामुळे, पुढील कारवाईचा निर्णय घेण्यात आला.
लॅपटॉप खरेदीत गैरव्यवहार झाला आहे. अधिकार्यांनी दिशाभूल केल्याने आरोग्य स्थायी समिती बैठकीत निविदेचा ठराव करण्यात आला आहे. तो बेकायदेशीर आहे. तो ठराव परत पाठवावा. याबाबत ठराव झाला तर सभागृहावर गंडांतर येऊ शकते. त्यामुळे, हा ठराव रद्द करण्यात निर्णय घेण्यात आला. नगरसेवक रवी साळुंखे यांनी लॅपटॉपचा दर्जा का तपासला नाही, असा सवाल केला. अखेर या प्रकरणात नागरी हक्क अंमलबजावणी पोलिसांनी ठेेकेदाराला क्लीन चीट दिली असून आता लेखाधिकार्यांकडून चौकशी करण्यात येत आहे. त्याचा अहवाल आपल्याकडे द्यावा, अशा सूचना महापौर पवार यांनी केल्या.
शहारातील रस्त्यांची वाताहात झाली आहे. जर या खड्ड्यांमुळे कुणाचा अपघात झाला तर ते लोक अधिकार्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करतील. एलअँडटी कंपनीकडून ठिकठिकाणी खोदाई केली आहे. ती व्यवस्थित करावी; अन्यथा पुढील मंगळवारी तुम्हाला कार्यालयात कोंडून घालू, असा इशारा आमदार अभय पाटील यांनी दिला.