बेळगाव : महापौर मंगेश पवार आणि नगरसेवक जयंत जाधव यांच्यावरील अपात्रतेला उच्च न्यायालयाने अंतरीम स्थगिती दिली असली, तरी अद्याप तो निकाल प्रादेशिक आयुक्तांकडून महापालिकेला मिळालेला नाही. त्यामुळे, बुधवारी (दि. 2) महापौर महापालिकेकडे फिरकले नाहीत.
गोवावेस येथील खाऊकट्टाप्रकरणी प्रादेशिक आयुक्तांनी मंगेश पवार आणि जयंत जाधव यांच्यावर अपात्रतेचा आदेश दिला. हा आदेश नगरविकास खात्याने कायम ठेवला. तर उच्च न्यायालयाने मंगळवारी (दि. 1) या निर्णयाला अंतरीम स्थगिती दिली. त्यामुळे, महापौर पवार आणि नगरसेवक जाधव यांना दिलासा मिळाला आहे.
या निकालामुळे महापौर पवार बुधवारी महापालिकेत येतील, असा कयास होता. त्यांनी सकाळी कौन्सिल विभागाला फोन करुन वाहन पाठविण्यास सांगितले. पण, प्रादेशिक आयुक्तांकडून महापालिकेला अद्याप सूचना आली नसल्यामुळे त्यांनी वाहन पाठवू शकत नाही, असे सांगितले. शिवाय संध्याकाळपर्यंत महापौरांच्या कक्षासमोरील नामफलकावर लावण्यात आलेले कापड कायम होते.
संध्याकाळपर्यंत प्रादेशिक आयुक्तांकडून महापालिकेला महापौरांवरील कारवाईला झालेल्या स्थगितीबाबत कोणतीही सूचना देण्यात आली नाही. त्यामुळे महापौर पवार दिवसभर महापालिकेकडे फिरकले नाहीत. पण, आयुक्त शुभा बी. यांच्या सांगण्यावरुन संध्याकाळी महापौरांच्या नामफलकावरील कापड काढण्यात आले. आता गुरुवारी तरी प्रादेशिक आयुक्तांकडून महापालिकेला सूचना येतात की नाही, हे पाहावे लागणार आहे. या प्रकरणाची सुनावणी पुन्हा सोमवारी होणार आहे.