

बेळगाव : बेळगाव, चिकोडी व धारवाड विभागातील परिवहन विभागात बसचालक, तांत्रिक कर्मचार्यांची कमतरता असून ती दूर करावी. खासगी तांत्रिक कर्मचार्यांची कंत्राटी भरती केली आहे; मात्र कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे. शक्ती योजनेअंतर्गंत महिलांना मोफत प्रवास सुविधा आहे. मात्र त्याचा निधी सरकारकडून आलेला नाही, त्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, अशा तक्रारी बेळगाव विभागीय नियंत्रण अधिकारी देवाक्का नायक यांनी सोमवारी मांडल्या.
बेळगाव, चिकोडी व धारवाड विभागाच्या परिवहन मंडळाच्या समस्यांबाबत अधिकार्यांसबोत संयुक्त बैठक केपीटीसीएलच्या सभागृहात सोमवारी (दि.30) झाली. त्यावेळी नायक बोलत होत्या. पालकमंत्री सतीश जारकीहोळी अध्यक्षस्तानी होती. परिवहन महामंडळ अध्यक्ष आमदार राजू कागे, आमदार राजू सेट व्यासपीठावर उपस्थित होते.
नायक म्हणाल्या, परिवहन मंडळात 470 चालकांची, बेळगाव विभागात 135 तांत्रिक कर्मचार्यांची आवश्यकता आहे. नवीन शहर बस स्टँड स्मार्ट सिटीकडून बांधले असून काम पूर्णत्वाच्या टप्यात आहे. स्टँडच्या मध्यभागी मंदिर होते, मंदिराला पर्यांयी जागा दिली आहे. मूळ मंदिराच्या जागेवर काँक्रिटकरण करावे.
बेळगाव जिल्ह्यात 3 विभागांतर्गंत एकूण 15 बस आगारद्वारे 1,608 बसेस रोज धावतात. शक्ती योजनेपूर्वी रोज सरासरी 5 लाख 40 हजार प्रवासी प्रवास करत होते. शक्ती योजनेच्या सुरवातीनंतर रोज सरासरी 7 लाख 89 हजार प्रवासी प्रवास करत आहेत. सुमारे अडीच लाख प्रवाशांची वाढ झाली. शक्ती योजनेअंतर्गत 11 जून 2023 ते 27 जून 2025 पर्यंत 945 कोटी रूपयांची शून्य तिकिटे वितरीत करण्यात आली आहेत.
पालकमंत्री जारकिहोळी यांनी समस्यांची माहिती घेऊन टप्याटप्याने सुविधा पुरवल्या जातील, असे सांगितले. जीर्ण अवस्थेत असलेले बस आगार पाडणे, नवीन बस आगारची पुनर्बांधणी, बस आगार मंजूर पण जागेची समस्या, नवीन बसेसची मागणी, 10 लाख किमी पेक्षा जास्त धावलेल्या बसेसची समस्या, सुटे भाग समस्या, वाहतूक सुविधा नसलेली गावे यावरही तोडगा काढण्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.
आमदारांच्या प्रलंबित मागण्या, कर्मचारी निवास आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी परिवहन मंडळाचे सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांचे बस पास सुरळीत पद्धतीने देऊन कोणत्याही विभागातील बस सेवा ठप्प करू नका. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास अडचण भासणार नाही, याची दक्षता घ्या. कोणतीही तक्रार येते कामा नये, असा सज्जड इशारा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी अधिकार्यांना दिला.
काँग्रेस आमदारांच्या समस्या ऐकण्यासाठी प्रदेश काँग्रेस प्रभारी आणि एआयसीसी सरचिटणीस रणदीपसिंग सूरजेवाला बंगळूरमध्ये दाखल झाले आहेत. असंतुष्ट आमदारांच्या समस्या, नाराज आमदारांची मनधरणी करण्याचे प्रयत्न करणार आहेत. सर्व माहिती संग्रहित करून पक्षश्रेठींना देणार आहेत. तथापि राज्यात कोणताच बदल होणार नाही, असे जारकीहोळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले.