बंगळूर : बंगळूरमध्ये रहदारीच्या ठिकाणी गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरणार्या सहा तरुणांच्या टोळीला बंगळूर पोलिसांनी अटक केली आहे. त्यात बेळगाव जिल्ह्यातील चौघांचा समावेश आहे, तर दोघे आंध्र प्रदेशचे आहेत. त्यांच्याकडून 25 लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
सागर सण्णक्की (वय 32), शिवकुमार (वय 30), गुड्डूसाब मुल्ला ऊर्फ गुड्डू (वय 36, तिघेही रा. घटप्रभा, जि. बेळगाव) आणि हालप्पा (वय 29, रा. मुडलगी, जि. बेळगाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर नागनुरी कुमार (वय 22), शिवशंकर (वय 20) हे दोन युवक आंध्रचे आहेत. या टोळीकडून 70 मोबाईल फोन, 1 कार आणि एक ऑटो जप्त करण्यात आला आहे. बंगळूर प्रगती-नगरमधील एका प्रवाशाने बीएमटीसी बस स्थानकावरून कोडलुगेट येथे जाताना बसमध्ये चढताना मोबाईल फोन चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली होती.
इलेक्ट्रॉनिक सिटी पोलिस निरीक्षक नवीन जी. एम. यांनी तपास करून आधी होसूर मेन रोडवरील बीएमटीसी बस स्थानकाजवळ तिघांंना अटक केले. त्यांच्याकडून 21 मोबाईल फोन आणि एक एर्टिगा कार जप्त करण्यात आली. याशिवाय आणखी चार साथीदारांचा सहभाग असल्याचे उघड झाले. त्यानंतर देवनहळ्ळीतील अंजनेय स्वामी मंदिराजवळ आणखी तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 49 मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेली ऑटोरिक्षा जप्त करण्यात आली. रिक्षामालकाचा शोध घेतला जात आहे.