बेळगाव ः शहरातील मोकाट कुत्र्यांच्या समस्येबाबत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बैठक घेऊन सूचना केली आहे. त्यामुळे शहरात मोकाट कुत्र्यांसाठी काही ठिकाणी लवकरच फिडिंग झोन तयार करण्यात येणार आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी बुधवारी (दि. 7) पत्रकारांशी बोलताना दिली.
ते म्हणाले, शहरात मोकाट कुत्र्यांची समस्या वाढली आहे. त्यामुळे ही समस्या दूर करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर काम सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सर्व अधिकाऱ्यांची आणि स्वयंसेवी संघटनांची बैठक घेतली आहे. त्या बैठकीतील निर्णयानुसार आरोग्य विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. शहरात फिडींग झोन उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी जागा निश्चिती करण्यात येणार आहे. मोकाट कुत्र्यांना खायला घालण्यासाठी ती जागा असणार आहे.
महापालिकेने याआधीच हिरेबागेवाडी येथे दोन एकर जागा निश्चित केली आहे. त्या ठिकाणी मोकाट कुत्र्यांसाठी निवारा शेड आणि नसबंदी केंद्र उभारण्यात येत आहे. येत्या दोन महिन्यांत हे काम पूर्ण होणार आहे. पण, सध्या त्याठिकाणी नसबंदी केंद्रसाठी तात्पुरते शेड उभारण्यात आले आहे. त्याठिकाणी मोकाट कुत्र्यांची नसबंदी करण्यात येत आहे. कुत्र्यांची नसबंदी झाली तर त्यांच्यातील आक्रमकपणा कमी होतो. त्यामुळे या केंद्रासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असेही आयुक्त कार्तिक एम. यांनी सांगितले.