

बेळगाव : आझादनगर परिसरात भटक्या कुत्र्यांच्या कळपाने रविवारी (दि. 4) दोन वर्षांच्या मुलावर जीवघेणा हल्ला केला. त्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. अहमद रमीज बिस्की (वय 2) असे जखमी बालकाचे नाव आहे.
अहमद हा रविवारी आपल्या घराजवळील गल्लीत खेळत असताना अचानक सात ते आठ भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर झडप घातली. कुत्र्यांनी बालकाला फरफटत नेले. त्याचा चावा घेतल्याने शरीरावर अनेक ठिकाणी गंभीर जखमा झाल्या. घटना लक्षात येताच परिसरातील लोकांनी धाव घेऊन बालकाला कुत्र्यांच्या तावडीतून सोडवले. गंभीर जखमी अवस्थेत त्याला तातडीने शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर आझादनगर परिसरात लोकांत भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. शहर व उपनगरांमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, महापालिकेकडून या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष होत आहे. भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासामुळे अनेक भागांत लहान मुले, विद्यार्थी व महिलांसाठी घराबाहेर पडणेही धोकादायक बनले आहे. कुत्रा चावण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना प्रशासनाकडून केवळ कागदी उपाययोजना होत असल्याची भावना लोकांतून व्यक्त होत आहे.