खानापूर : चापगावमधील (ता. खानापूर) बेपत्ता तरुणाचा अपघातात मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. भुजंग पुंडलिक धबाले (वय 32) असे त्याचे नाव आहे.
भुजंग 30 नोव्हेंबर रोजी गावातीलच पांडुरंग पाटील यांची दुचाकी घेऊन गेला होता. त्यानंतर तो घरी परतला नव्हता. तसेच फोनही उचलत नव्हता. याबाबत पांडुरंग पाटील यांनी नंदगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास शिवाजीनगरमधील एक तरुण खानापूर-गर्लगुंजी मार्गाने जात असताना भंडरगाळी गावच्या हद्दीतील नाल्याजवळ एका झुडपात दुचाकी पडलेली आढळून आली. ही दुचाकी पांडुरंग पाटील यांची असल्याचे स्पष्ट झाले. आजूबाजूला पाहणी केली असता मृतदेहाचे अवशेष व कवटी दिसून आली. दीड महिन्यांपूर्वी अपघातात मृत्यू झाल्याने मृतदेहाची अशी अवस्था झाल्याचा अंदाज आहे. अपघातस्थळी मृताचे कपडेही दिसून आले. त्यावरुन मृताची ओळख पटली. नाल्याजवळील वळणावर दुचाकीवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाल्याचे तपासात आढळून आले आहे.