

नागज : विजापूर-गुहागर राज्यमार्गावर नागज (ता. कवठेमहांकाळ) येथील यल्लमा मंदिराजवळ बुधवारी दुपारी एक भीषण अपघात घडला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव मोटार पुलावरून सुमारे 100 फूट खाली ओढ्यात कोसळली. या अपघातात नवनाथ मल्लिकार्जुन माने (वय 25, रा. दरिबडची, ता. जत) हा युवक गंभीर जखमी झाला.
नवनाथ माने हा मोटार घेऊन जतच्या दिशेने निघाला होता. नागज येथील यल्लमा मंदिराजवळ त्याचा मोटारीवरील ताबा सुटला. वेग जास्त असल्याने मोटार पुलाच्या कठड्यावरून थेट 100 फूट खाली ओढ्यात कोसळली. अपघाताची माहिती मिळताच नागज येथील जयसिंग सरवदे यांनी घटनास्थळी धाव घेत गाळात अडकलेल्या मोटारीतून नवनाथला बाहेर काढले. त्यानंतर नागज प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून त्याल पुढील उपचारासाठी मिरज येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.