बेळगाव : गेल्या सहा महिन्यांपासून शांत असलेले चेनस्नॅचर्स पुन्हा सक्रिय झाले आहेत. महिनाभरात बेळगाव शहर परिसरात सहा तर जिल्ह्यात दोन चेनस्नॅचिंगच्या घटना घडल्या आहेत. चार दिवसांपूर्वी माळमारुती परिसरात एका वृद्धेचे सहा तोळ्यांचे दागिने दुचाकीवरुन आलेल्या भामट्यांनी पळवून नेल्याच्या घटनेची सोमवारी (दि. 1) नोंद झाली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, पुष्पा चिदानंद क्षीरसागर (वय 76, रा. अंजनेयनगर) ही वृद्ध महिला 26 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास या परिसरात असलेल्या गणेश मंदिराकडे निघाली होती. यावेळी दुचाकीवरुन आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळ्यातील दागिन्यांना जोराचा हिसडा मारला.
त्यांच्या गळ्यात तीन तोळ्यांचे मंगळसूत्र व तीन तोळ्यांची बोरमाळ होती. हे दोन्ही दागिने चोरट्यांच्या हाती लागले. त्यांनी घेऊन पोबारा केला. महिलेने आरडाओरड केली तरी भामटे पसार झाले. वृद्ध महिला व तिचे पती दोघेच राहत असल्याने चार दिवस झाले तरी त्यांनी याची फिर्याद दिली नव्हती. परंतु, सोमवारी त्यांनी माळमारुती ठाणे गाठून याबाबतची फिर्याद दाखल केली. नोंद करुन घेत निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांनी तपास सुरु केला आहे.
13 नोव्हेंबर रोजी टिळकवाडी पोलिसांनी दोघा चेनस्नॅचर्सना अटक करून त्यांच्याकडून 10 लाखांचे दागिने जप्त केले. हे चोरटे देखील शहरातच सक्रिय होते. त्यांनी मंडोळी रोडसह शहरात पाच ठिकाणी चेनस्नॅचिंग केल्याचे तपासात स्पष्ट झाले. सप्टेंबरमध्येही चेनस्नॅचिंगच्या अनेक घटना घडल्या आहेत.
उपनगरांमध्ये अधिक
चेनस्नॅचर्स उपनगरांमध्ये अधिक सक्रिय असल्याचे दिसून आले आहे. जाण्यासाठी ऐसपैस रस्ते, रस्त्यावरुन एकटीच जाणारी महिला सहज दिसते. त्यामुळे, अशा घटना अंजनेयनगर, महांतेशनगर, बॉक्साईट रोड, सर्वोदय कॉलनी, सह्याद्रीनगर, हनुमाननगरसह मोठ्या उपनगरांमध्येच अधिक घडताना दिसून येतात. आधीच्या अनुभवानुसार विशेषतः या घटना एपीएमसी व माळमारुती पोलिस ठाण्याच्या हद्दीतच घडल्याचे दिसून येते.
इराणी टोळीचा धसका
पूर्वी बेळगावात इराणी टोळ्या सक्रिय होत्या. बेळगावात आठवड्यातून कमीत कमी दोन ते तीन घटना घडत असत. त्यामुळे, पोलिसांनी या इराणी टोळीचा चांगलाच धसका घेतला होता. परंतु, दहा वर्षांपूर्वी इराणी टोळीतील एकावर गोळीबार करत मोठी टोळी जेरबंद केली. त्यावेळी सध्याचे माळमारुती ठाण्याचे पोलिस निरीक्षक गड्डेकर याच ठाण्यात उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. इराणी टोळीला जेरबंद करताना ते देखील जखमी झाल्याची घटना घडली होती.
पोलिस बंदोबस्तात चोरट्यांना संधी
कोणताही बंदोबस्त आला की चोरटे अधिक सक्रिय होतात. आता अधिवेशनामुळे पोलिस खाते पूर्णपणे तिकडे लक्ष देऊन आहे. त्यामुळे, शहरातील दिवसा आणि रात्रीची गस्त देखील काही अंशी कमी झाली आहे. याचा फायदा चोरटे आणि चेनस्नॅचर्स उठवताना दिसत आहेत. त्यामुळे, पोलिसांनी घरोघरी पोलिस आणि बीट पोलिस संकल्पना अधिवेशन काळातही सुरु ठेवण्याची गरज व्यक्त होत आहे.