

बेळगाव : नव्याने बांधलेल्या अंगणवाडी इमारती अपूर्ण आहेत. संबंधित तालुक्यातील सीडीपीओंना अंगणवाडी इमारतींना भेट देऊन प्रगतीची पाहणी करण्याचे आणि एका आठवड्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हा नियोजन संचालक रवी एन. बंगारेप्पण्णावर यांनी दिले.
शहराच्या महिला व बालविकास विभागाच्या उपसंचालक कार्यालयात बुधवारी (दि. 11) अंगणवाडी इमारती व पायाभूत सुविधांवरील प्रगती आढावा बैठक झाली. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.
ते म्हणाले, अंगणवाड्यांसाठी पिण्याचे पाणी आणि शौचालये बांधण्यासाठी महिला व बालविकास विभागाकडून निधी देण्यात आला आहे. ती कामे लवकर सुरु करावीत. पावसाळा सुरु झाला असल्याने पर्यवेक्षकांनी प्रत्येक अंगणवाडीला भेट देऊन तपासणी करावी आणि सीडीपीओंना अहवाल सादर करावा. सहा वर्षे पूर्ण झालेल्या मुलांचे शाळेत प्रवेश, गर्भवती आणि प्रसुत मातांसाठी जेवणाची सुविधा उपलब्ध करुन देणे, पालकांची बैठक दरमहा तिसर्या शनिवारी आयोजित करावी, असे त्यांना सांगितले.
अंगणवाडी केंद्रांमध्ये शौचालय आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा असावी आणि मुलांना उकळलेले पिण्याचे पाणी द्यावे. ते स्वच्छ वातावरण असावे. खोकला, ताप, सर्दी इत्यादींसाठी मुलांवर उपचार करावेत. केंद्रांमध्ये विद्युत तारेची डिस्क असल्यास ती दुरुस्त करावी, असे निर्देश बंगेरप्पण्णावर यांनी दिले.
महिला व बालविकास विभागाचे उपसंचालक नागराज आर., अण्णाप्पा हेगडे, सर्व सीडीपीओ आणि कर्मचारी बैठकीला उपस्थित होते.