ज्ञानेश्वर पाटील
बेळगाव : कॅपिटल वन संस्थेतर्फे यंदा सलग 14 व्या वर्षी आयोजित आंतरराज्य एकांकिका स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नाटकाची ओढ असल्याने रंगमंचावरील थरार अनुभवण्याची संधी बेळगावकर रसिकांना मिळाली. दोन दिवसांत 16 एकांकिकांचे सादरीकरण झाले. कौटुंबिक नातेसंबंध, सामाजिक वास्तव आणि भावभावनांच्या गुंतागुंतीचे पदर उलगडणाऱ्या संहितेने प्रेक्षकांना अंतर्मुख केले. या स्पर्धेने बेळगावच्या सांस्कृतिक चळवळीलाही गती दिली आहे.
यंदाच्या स्पर्धेत तरुणाईचा कसदार अभिनय आणि तंत्रज्ञानाचा वापर यांचे उत्तम मिश्रण पाहायला मिळाले. दर्जेदार संहिता आणि प्रभावी सादरीकरण हे यंदाच्या स्पर्धेचे मुख्य वैशिष्ट्य होते. ‘कॅपिटल वन’ संस्थेने उभारलेले हे व्यासपीठ स्थानिक कलाकारांसाठीही पर्वणी ठरले. चार संघांनी केलेल्या सादरीकरणात नाविन्य होते. ‘परिवर्तनाचा वाटसरु’ या एकांकिकेने डॉ. शिवाजी कागणीकर यांच्या कार्याला उजाळा दिला. मेधा मराठे यांच्या ‘खरवस’ ने घरच्या अन्नाचे महत्त्व अधोरेखित केले. ‘झाले मोकळे आभाळ’मधून अस्वस्थ करणारे वास्तव मांडण्यात आले. स्थानिक एकांकिकेतून केवळ अभिनयच नव्हे, तर दर्जेदार नेपथ्य, प्रकाशयोजना आणि सुश्राव्य संगीतातून दाद मिळवली.
आयोजकांच्या नियोजनामुळे आणि रसिकांच्या उदंड प्रतिसादामुळे ही स्पर्धा केवळ स्पर्धा न राहता ’नाट्यमहोत्सव’ ठरली. नवे विषय, नव्या कलाकारांमुळे यंदा नाट्याविष्कारात ताजेपणा जाणवला. नव्या कलाकारांच्या अभिनयाचा दर्जा उंचावत आहे, याची अनुभूतीही रसिकांना मिळाली. नव्या जीवनशैलीशी निगडीत वेगळे विषय कलाकारांनी ताकदीने मांडले. तळ्यात मळ्यात किंवा ग्वाही यासारख्या एकांकिका अस्वस्थ करणाऱ्या होत्या. स्पर्धेत असेच वेगळे विषय असल्याने बक्षीस देताना परीक्षकांना कसरत करावी लागली. पती-पत्नीतील दुभंगणारे नाते, हतबलता, दारिद्य्र, नातेसंबंधातील ताण, सामाजिक वास्तव अशा विषयांचे एकांकिकातून सादरीकरण झाले. नवनवीन विषयांना धाडसाने हात घालणाऱ्या कलावंतांचे रसिकांनी कौतुक केले.