Shocking incident in Belgaum: बेळगाव जिल्ह्यातील रायबाग शहरातील एका बारमध्ये ३ वर्षाच्या मुलाला एका व्यक्तीनं दारू पाजल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागान गंभीर दखल घेतली असून या प्रकरणी कडक कारवाई करणार असल्याचं बेळगाव विभागाच्या सह आयुक्तांनी सांगितलं.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार एका मध्यम वयाचा पुरूष प्रितम बार आणि रेस्टराँमद्ये एका मुलाला घेऊन आला होता. त्या व्यक्तीनं मुलाला बळजबरीनं दारू पाजली होती. ही घटना ज्यावेळी उजेडात आली त्यावेळी बार मालक आणि कर्मचाऱ्यांवर टीकेची झोड उठली होती. या ३ वर्षाच्या मुलाला बारमध्ये प्रवेशच कसा दिला अशी विचारणा नेटकऱ्यांनी केली होती. त्याचबरोबर या व्यक्तीच्या बेजबाबदार कृतीवरून देखील मोठी टीका होत आहे.
दरम्यान, ही घटना बारमध्ये उपस्थित असलेल्या एका व्यक्तीनं या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर समोर आली. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
माध्यमाशी बोलताना राज्य उत्पादन शुल्क बेळगाव विभागाचे सह आयुक्त फकिराप्पा चलवाडी यांनी सांगितले की त्यांच्या विभागानं या घटनेची गंभीर दखल घेतली असून कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.
ते म्हणाले, 'एका अल्पवयीन मुलाला बारमध्ये प्रवेश देणं अन् त्याला दारू देणं हे कायद्याचं सरळ सरळ उल्लंघन आहे. बारमध्ये दारू देण्याचे कायदेशीर वय हे २१ वर्षे आहे. या प्रकरणी बार मालकावर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे.'
जव्हेनाईल जस्टिस अॅक्ट २०१५ अन्वये वैद्यकीय सल्ल्याशिवाय एखाद्या मुलाला नशेचे पदार्थ देणाऱ्याला सात वर्षाचा तुरूंगवास आणि १ लाखापर्यंतचा आर्थिक दंड शिक्षेची तरतूद आहे.