

वर्धा : वर्धा शहरात पोलिसांच्या पथकाने अवैध दारू वाहतुकीवर मोठी कारवाई करत दारूसाठ्यासह वाहन जप्त केले. पोलिसांनी सात लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. परीक्षाविधीन पोलीस उपनिरीक्षक विशाल सवाई पथकासह शहर परिसरात गस्त घालत होते. दरम्यान, गुप्त बातमीदारामार्फत कारमध्ये देशी व विदेशी दारूची अवैध वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तत्काळ सिद्धार्थनगर परिसरात नाकेबंदी केली.
थोड्याच वेळात ती कार दिसताच पोलिसांनी तिला थांबविण्याचा प्रयत्न केला, मात्र चालकाने गाडी मोकळ्या रस्त्याने पळवली. पोलिसांनी पाठलाग करत अखेर ती कार लक्ष्मीनगर आलोडी परिसरात उभी अवस्थेत मिळवली, मात्र आरोपी पसार झाला. तपासणी केली असता २ लाख ४१ हजार ५०० रुपयांचा अवैध दारू साठा जप्त करण्यात आला. पोलिसांनी कार आणि दारूसाठ्यासह ७ लाख ८१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक संतोष ताले आणि प्रभारी निरीक्षक अजय भुसारी यांच्या देखरेखीखाली पोलिस उपनिरीक्षक विशाल सवाई आणि पथक शैलेश चाफलेकर, प्रशांत वंजारी, गजेंद्र धर्मे, अभिजीत वाघमारे, अक्षय सावळकर, वैभव जाधव, श्रावण पवार, रंजीत बुरशे, शिवा डोईफोडे, नंदकिशोर धुर्वे व अभिषेक मते यांनी केली.