

विजापूर : विजापूर शहरात मानवतेला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. शहरातील दिवटगिरी गल्लीमध्ये दूध आणण्यासाठी दुकानात गेलेल्या महिलेवर दोन दरोडेखोरांनी हल्ला केला. कानातील रिंग आणि मंगळसूत्र हिसकावून त्यांनी पळ काढला. दागिने हिसकावल्याने त्यांचा कान फाटला आहे. सदर घटना शुक्रवार दि. 26 रोजी सायंकाळी घडली.
दरोडेखोरांच्या हल्ल्यात कलावती गायकवाड (वय 45) या जखमी झाल्या आहेत. आरोपी मास्क घालून आले होते. प्रथम ते त्या महिलेशी तिच्या मुलाचे मित्र असल्याचे सांगत बोलले. त्यानंतर अचानक तिच्यावर हल्ला केला. त्यांनी सुमारे 10 ग्रॅमचे मंगळसुत्र आणि 1 ग्रॅम कानातील रिंग चोरून पळ काढला. त्या दरोडेखोरांनी कान कापून सोने लंपास केल्याने ती महिला गंभीर जखमी झाली. तिला तातडीने शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या महिलेवर सध्या उपचार सुरु आहेत. हे कृत्य त्याच परिसरातील तरुणांनी केल्याचा संशय आहे. गांजाच्या नशेत त्यांनी हे कृत्य केल्याचा संशय आहे. या प्रकरणी गोलघुमट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींना शोधण्यासाठी सापळा रचला आहे. शहरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.