अथणी बंद, चिकोडीत विद्यार्थी रस्त्यावर 
बेळगाव

Belgaum News : अथणी बंद, चिकोडीत विद्यार्थी रस्त्यावर

जिल्हा मागणीसाठी दोन्ही तालुक्यांत आंदोलनाला जोर

पुढारी वृत्तसेवा

अथणी : अथणी जिल्हा घोषणा करण्याच्या मागणीसाठी बुधवार दि. 11 रोजी पुकारलेल्या बंदला सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आंदोलनाच्या पदाधिकार्‍यांना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गुरुवारी दुपारची वेळ चर्चेसाठी दिल्याने आशा उंचावल्या असून आंदोलन मागे घेण्यात आले. बंदला सर्व व्यावसायिकांचाही पाठिंबा मिळाला.

अथणी बंदची हाक दिल्याने शहरातील दुकाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा देण्ीयात आला. बससेवाही बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. सध्या अथणीहून बेळगाव अंतर सुमारे 200 किमी असल्याने वेळ आणि पैसा अधिक खर्च होत आहे. त्यामुळे त्वरित अथणी जिल्हा घोषणा करावी, मागणीसाठी डॉ. आंबेडकर चौकामध्ये आंदोलन करण्यात आले. आंदोलनामध्ये शिवबसव स्वामी, मरूळसिद्ध स्वामी, सुरेश महाराज, शिवकुमार सवदी, जिल्हा आंदोलन समितीचे अध्यक्ष प्रशांत तोडकर, विजयकुमार आढळी यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

चिकोडीत भव्य मोर्चा, तहसीलदारांना निवेदन

चिकोडी जिल्हा मागणीसाठी बुधवारी विद्यार्थ्यांनी शहरात मोर्चा काढून आंदोलन केले. चिकोडी जिल्हा मागणीसाठी मजलट्टी येथील बी. आर. संगाप्पगोळ समूह शिक्षण संस्थेच्या हजारो विद्यार्थ्यांनी इंदिरानगर क्रॉसपासून बसव सर्कलपर्यंत भव्य मोर्चा काढला. काही वेळ बसवेश्वर सर्कल येथे मानवी साखळी करून रास्तारोको केला. त्यानंतर मिनी विधानसौध येथे विद्यार्थ्यांनी चिकोडी जिल्हा आंदोलन समितीच्या पदाधिकार्‍यांसह ग्रेट टू तहसीलदार प्रमिला देशपांडे यांना निवेदन दिले.

रुद्रप्पा संगाप्पगोळ म्हणाले, चिकोडी जिल्ह्यासाठी गेल्या तीन दशकांपासून आंदोलन सुरू आहे. सरकारकडून चिकोडी जिल्हा करण्याचे आश्वासन देण्यात येत. मात्र त्यानंतर त्यांना विसर पडतो. बेळगाव येथील अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी चिकोडी जिल्ह्याची घोषणा करावी. जिल्हा आंदोलन समितीचे अध्यक्ष निवृत्त प्राध्यापक एस. वाय. हंजी म्हणाले, चिकोडी जिल्हा निर्मितीसाठी आ. दुर्योधन ऐहोळे, आ. शशिकला जोल्ले, आ. राजू कागे, आ. भालचंद्र जारकीहोळी आदींनी सभागृहात आवाज उठवून चिकोडी जिल्हा करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे चिकोडी जिल्हा होण्यास मदत होणार आहे. यावेळी सुरेश ब्याकुडे, अशोक पाटील, नागेश माळी, संजय पाटील, जगन्नाथ सुळकुडे आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT