बेळगाव : दहा दिवसांवर आलेल्या अधिवेशनाची जिल्हा व पोलिस प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे. जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त आणि जिल्हा पोलिस प्रमुखांकडून तयारीसाठी रोज बैठका सुरू आहेत. सध्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रजा व सुट्ट्या रद्द करण्यात आल्याची अलिखित घोषणा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली आहे. त्यामुळे सरकारी बाबूंना सध्या 12 ते 14 तास काम करावे लागत आहे.
बेळगावातील हिवाळी अधिवेशनावेळी सरकारी अधिकाऱ्यांना घरच्या लग्न समारंभासारखी तयारी करावी लागते, अशी विडंबनात्मक प्रतिक्रिया काही अधिकारीच स्वतः देत आहेत. दरवर्षीच्या अधिवेशनाच्या अनुभवामुळे आता अधिवेशन म्हणजे अधिकाऱ्यांसाठीही एक इव्हेंट बनला आहे. पूर्वी ताण घेणारे अधिकारी आता अधिवेशन काळ आनंददायी कसा जाईल, हे अनुभवातून शिकलेले आहेत. परंतु, या काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये, याची खबरदारी घेण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांना पार पाडावी लागते.
बुधवारी अधिवेशनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्री जी. परमेश्वर बेळगावला आले होते. जी काही तयारी झाली आहे. त्याबाबतची माहिती सर्व जिल्हाधिकारी व पोलिस अधिकाऱ्यांनी गृहमंत्र्यांना सांगितली. उर्वरित कामेही भराभर संपवून घ्या. काही गरज असल्यास आपल्याला कळवा, असा विश्वास गृहमंत्र्यांनी सर्वच अधिकाऱ्यांना दिला आहे. त्यामुळे अधिकारी रात्रंदिवस कामाला लागले आहेत. परंतु, पूर्ण तयारीसाठी अद्याप काही दिवस लागणार असून पुढील दहा दिवसांत सर्वतोपरी तयारी होईल, असा अधिकाऱ्यांना विश्वास आहे.
सध्या लग्नसराई सुरू असून अनेक अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांची, मित्रांच्या मुला-मुलींचे लग्न असल्याने त्यासाठी आपल्या वरिष्ठांकडे सुुट्ट्या मागत आहेत. परंतु अधिवेशन संपेपर्यंत कोणालाही सुटी मिळणार नाही, असा दम वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भरला आहे. त्यामुळे ज्या सरकारी अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या घरी लग्नकार्य आहे, त्यांनी लग्नाची तारीखच पुढची काढण्याचा निर्णय घेतला असल्याचे दिसून येत आहे. 20 डिसेंबरपर्यंत कोणीही रजा व सुुट्ट्या मागू नये, असे फर्मान वरिष्ठांनी काढल्याने सरकारी बाबूंची गोची झाली आहे.