

बेळगाव : महाराष्ट्र एकिकरण समिती नेते व कार्यकर्त्यांवर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे पोलिसांनी दाखल केले आहेत. त्यामधील सहा गुन्ह्यांच्या खटल्याची सुनावणी मंगळवारी (दि. 18) जिल्हा न्यायालयात होती. मात्र, काही खटल्यांतील साक्षीदार व फिर्यादी हजर नसल्यामुळे या खटल्यांची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.
म. ए. समितीने 2017, 2018, 2021 मध्ये महामेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते. परवानगी न घेता महामेळावे आयोजित करण्यात आले. म्हणून म. ए. समितीचे नेते दीपक दळवी, माजी आमदार मनोहर किणेकर, प्रकाश मरगाळे, माजी महापौर मालोजी अष्टेकर, शिवाजी सुंठकर, प्रकाश शिरोळकर, माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर यांच्यासह इतर कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकल मराठा मोर्चा वेळी टी-शर्टवर महाराष्ट्र असा उल्लेख केला. त्याची विक्री करणाऱ्या शहाजीराजे भोसले व मोर्चाचे आयोजक प्रकाश मरगाळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. खडेबाजार, कॅम्प व टिळकवाडी पोलिस ठाण्यात हे गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्याची सुनावणी मंगळवारी जिल्हा न्यायालयात होती. मात्र, ती पुढे ढकलण्यात आली आहे. या सर्वांच्या वतीने ॲड. महेश बिर्जे, ॲड. बाळासाहेब कागणकर, ॲड. वैभव कुट्रे, ॲड. अश्वजीत चौधरी, ॲड. रिचमॅन रिकी काम पाहत आहेत.