कणगला : कंटेनरच्या धडकेत महामार्गावर कोसळलेली स्वागत कमान आणि नुकसानग्रस्त झालेला ट्रक Pudhari
बेळगाव

Karnataka Accident | कणगल्याजवळ भीषण अपघातात कंटेनर, ट्रकचे दोन तुकडे; दोन्ही वाहनांचे चालक बचावले

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कणगला हद्दीतील ग्लास फॅक्टरीसमोरील वळणावर अपघात

पुढारी वृत्तसेवा

Pune Bengaluru Highway Container Truck Collision

निपाणी : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कणगला हद्दीतील ग्लास फॅक्टरीसमोरील वळणावर बुधवारी (दि.१९) सकाळी कंटेनरने पुढे जात असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. तर वाहनांचे अक्षरशः दोन तुकडे झाले. सुदैवाने दोन्ही वाहनांचे चालक किरकोळ जखमी होऊन बचावले. अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

या अपघातात सुरज प्रजापती (वय ३०, रा. उत्तर प्रदेश) आणि राजू वडेटिनावर (वय ३७, रा. समर्थनगर, बेळगाव) हे दोघे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर बेळगाव येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची नोंद संकेश्वर पोलिस ठाण्यात झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कंटेनर चालक सुरज प्रजापती पुण्याहून बंगळूरकडे जात होता. तर राजू वडेटिनावर ट्रक घेऊन बेळगावच्या दिशेने निघाले होते. कणगला परिसरातील उतारावर ट्रक येत असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे ट्रकने महामार्गालगत असलेल्या संरक्षक लोखंडी ग्रीलला धडक दिली. त्याचवेळी मागून वेगाने येणाऱ्या कंटेनरची ट्रकला जोरदार धडक बसली.

धडकेनंतर दोन्ही वाहने महामार्गावरील लोखंडी स्वागत कमानीवर आदळली. या धडकेत स्वागत कमान रस्त्यावर कोसळली. अपघाताची तीव्रता इतकी होती की कंटेनर आणि ट्रकचे दोन तुकडे झाले आणि दोन्ही वाहने सुमारे २०० ते ३०० फूट फरफटत जाऊन थांबली.

स्वागत कमान रस्त्यावर कोसळल्याने कोल्हापूरहून बेळगावकडे जाणारी वाहतूक सुमारे दोन तास विस्कळीत झाली. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग देखभाल करणाऱ्या अवताडे कंपनीच्या भरारी पथकाचे निरीक्षक संतराम माळगे आणि अक्षय सारापुरे यांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर संकेश्वर पोलिस ठाण्याचे सीपीआय गणपती कोगनोळी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. जखमींना तातडीने सरकारी महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारांसाठी त्यांना बेळगाव येथे हलविण्यात आले.

या प्रकरणी अक्षय सारापुरे यांनी ट्रकचालकाविरोधात फिर्याद दिली असून, संकेश्वर पोलिस अधिक तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT