Karnataka Crime: प्रियकरासह संपत्तीसाठी पती, मुलाचा खून

पत्नीला अटक : बंगळूर येथे दुहेरी हत्याकांड
Karnataka Crime: प्रियकरासह संपत्तीसाठी पती, मुलाचा खून
Published on
Updated on

बंगळूर : उत्तर - पश्चिम बंगळूरमधील चिक्काबणावरा परिसरात घडलेल्या दुहेरी हत्याकांडाचा गुंता उकलण्यात पोलिसांना यश आले. अनैतिक संबंध आणि कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेच्या हव्यासापोटी पत्नीनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, ही हत्येची घटना पाहिल्यामुळे उघडकीस येण्याच्या भीतीने पाषाणहृदयी आईने स्वतःच्या चार वर्षांच्या निष्पाप मुलाचाही गळा आवळून खून केला. या प्रकरणी पोलिसांनी २६ वर्षीय हरिणी नावाच्या महिलेला अटक केली आहे. ३५ वर्षीय अभिनंदन (पती) आणि ४ वर्षांचा यदुवीर (मुलगा) अशी मृतांची नावे असून, त्यांची संपूर्ण नावे समजू शकली नाहीत.

असा उघडकीस आला प्रकार

सोमवारी सकाळी ७ च्या सुमारास हरिणीने स्वतः पोलिसांना फोन करून पती आणि मुलगा बिछान्यात निश्चल पडल्याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, दोघांचाही मृत्यू झाला होता. घटनास्थळाचा पंचनामा करताना पोलिसांना हरिणीच्या जबाबात तफावत आढळली. घरातील रक्ताचे डाग आणि रक्ताने माखलेले कपडे धुऊन वाळत घातल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

तपासणीत रविवारी रात्री १० नंतर घरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद करण्यात आले होते. हरिणीच्या मोबाईलमधील कॉल हिस्टरी व चॅट डिलिट करण्यात आले होते. पोलिसी हिसका दाखवत तब्बल ६ तास चौकशी केल्यानंतर हरिणीने गुन्ह्याची कबुली दिली.

logo
Pudhari News
pudhari.news