Nandgad Bidi Road Tree Collapse
खानापूर : खानापूर तालुक्यातील नंदगड-बिडी मार्गावर कसबा नंदगड गावाच्या हद्दीत शुक्रवारी (दि. ३) दुपारी रस्त्यावर आंब्याचे मोठे झाड कोसळल्याने दुचाकीवरून प्रवास करणारे वृद्ध जखमी झाले. या घटनेमुळे नंदगड-बिडी मार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली असून दोन्ही दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे.
या अपघातात पुंडलिक देवाप्पा पाटील (वय 75, रा. नरसेवाडी, ता. खानापूर) हे जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने नंदगड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सुदैवाने झाडाच्या फांद्या त्यांच्या दोन्ही पायांवर पडल्याने त्यांना किरकोळ दुखापत झाली असून मोठा अनर्थ टळला. याच घटनेत आणखी एका दुचाकीस्वारालाही किरकोळ दुखापत झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नंदगड परिसरात दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक झाडे धोकादायक अवस्थेत आली आहेत. शुक्रवारी (दि. 3) दुपारी सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास कसबा नंदगड गावाच्या हद्दीत नंदगड-बिडी मार्गावरील एक मोठे आंब्याचे झाड अचानक रस्त्यावर कोसळले. त्याचवेळी त्या मार्गावरून दुचाकीवरून जात असलेले पुंडलिक पाटील झाडाखाली अडकले.
स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेऊन त्यांची सुटका केली व उपचारासाठी रुग्णालयात हलविले. या घटनेत दोन्ही दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून रस्त्यावर झाड आडवे पडल्याने वाहतूक पूर्णपणे बंद झाली. घटनेची माहिती मिळताच नंदगड पोलिसांनी तसेच खानापूर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. झाड हटवून वाहतूक सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून नागरिकांनी या मार्गावरून प्रवास करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संततधार पावसामुळे परिसरातील अनेक झाडे धोकादायक स्थितीत असल्याने अशा घटना टाळण्यासाठी संबंधित वन विभागाने तातडीने पाहणी करून धोकादायक झाडांवर आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.