Belagavi news | बेळगावात ४५८ घुसखोर

राज्यात १३,६७५ : गृह खात्याची यादी; म्हैसूर, कारवार, उडुपी जिल्ह्यांतही लक्षणीय
Belagavi news |
Belagavi news | बेळगावात ४५८ घुसखोर
Published on
Updated on

बंगळूर : बेळगाव शहरासह राज्यात अवैधरीत्या प्रवेश करून वास्तव्य करणाऱ्या घुसखोरांचे प्रमाण वाढत आहे. बेळगावात ४५८, तर राज्यात १३,६७५ घुसखोर असून सर्वाधिक १०,६५० अवैध स्थलांतरित बंगळूर शहरात आहेत. राज्याच्या गृह खात्याने केलेल्या पाहणीत ही आकडेवारी आढळून आली असून घुसखोरांची संख्या यापेक्षाही अधिक असू शकते. म्हैसूर, कारवार, उडुपी जिल्ह्यांतही मोठ्या प्रमाणात घुसखोर असल्याचे उघड झाले आहे.

काही दिवसांपूर्वी म्हैसूरमध्ये बांगला देशी स्थलांतरित येत असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. त्यानंतर म्हैसूर रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांना सतर्क करण्यात आले असून पश्चिम बंगालहून आलेल्या हावडा एक्स्प्रेसची तपासणी करण्यात आली. पश्चिम बंगालहून येणाऱ्यांवर हिंदू कार्यकर्त्यांनी स्थलांतरित येत असल्याचा आरोप केल्यावर मोठा गदारोळ निर्माण झाला होता; मात्र कागदपत्रांच्या पडताळणीदरम्यान एकही बांगला देशी स्थलांतरित आढळला नव्हता. त्यामुळे अशा अफवा टाळण्यासाठी रेल्वे पोलिसांनी पुढाकार घेऊन स्वतःहून पडताळणी करण्याचे काम हाती घेतले आहे.

सध्या राज्य गृह खात्याने जिल्हानिहाय पाहणी करून घुसखोरांची आकडेवारी जमा केली आहे. त्यानुसार राज्यात १३,६७५ घुसखोर असल्याचे आढळून आले आहे. सर्वाधिक १०,६५० घुसखोर बंगळूर शहरात आढळून आले आहेत. त्याखालोखाल म्हैसूरमध्ये ८१० घुसखोर आहेत. याबाबतीत बेळगाव जिल्ह्याचा तिसरा क्रमांक असून ४५८ घुसखोर आहेत. याशिवाय मंगळूर २६८, रामनगर १९१, चिक्कबळ्ळापूर ३८, मंड्या ३७, बळ्ळारी ५३, हुबळी/धारवाड ३५, दावणगिरी २०, रायचूर १९, कोलार १३, कोडगू १०, कोप्पळ १०, गुलबर्गा ९, चित्रदुर्ग ८, हसन ५, चामराजनगर ३ अशी संख्या आहे.

उपाययोजना करण्याची मागणी

घुसखोरीच्या प्रकरणामुळे राज्य सरकारच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. परिस्थिती हाताळण्यासाठी उचललेल्या पावलांबाबत गृहमंत्री प्रियांक खर्गे यांच्याकडे विचारणा केली जात आहे. बंगळूरमध्ये हजारो बेकायदेशीर परदेशी स्थलांतरित राहत असल्याचे आढळले आहे. त्यामुळे त्यांची पडताळणी करणे, कायदेशीर कारवाई करणे आणि कायद्यानुसार जिथे लागू असेल तिथे त्यांना परत पाठवणे (हद्दपार करणे) यांसारख्या त्वरित उपाययोजनांची मागणी जोर धरत आहे.

बांगला देशी नव्हे, बंगाली

राज्यात मोठ्या प्रमाणावर बांगला देशी घुसखोर येत असल्याचे आरोप झाल्यानंतर बेळगाव पोलिसांनी गत महिन्यात शहरात तपासणी मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेंतर्गत पोलिस उपायुक्त नारायण बरमणी यांच्या नेतृत्त्वाखालील पथकाने २० संशयास्पद बांगला देशी घुसखोरांना ताब्यात घेतले होते. आधार कार्ड व अन्य कागदपत्रांची तपासणी केली असता सर्वजण पश्चिम बंगालचे रहिवासी असल्याचे उघडकीस आले होते. सर्वजण शहापूर भागात सुवर्ण कारागीर म्हणून काम करत असल्याचे व आपल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीत मतदान करून परतल्याचे आढळले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news