Belagavi news: बेळगावच्या पाच पर्यटकांवर गुन्हा

सुरल धबधबा दुर्घटना; गोवा वनखात्याची कारवाई, प्रतिबंधित वनक्षेत्रात प्रवेश
Belagavi news: बेळगावच्या पाच पर्यटकांवर गुन्हा
Published on
Updated on

खानापूर : म्हादई अभयारण्यातील मुख्य संरक्षित जंगलातील सुरलजवळील बाराजणांच्या धबधब्याखाली बेळगावमधील आदित्य दीपककुमार सत्पती (वय २०) हा तरुण बुडाल्याची घटना रविवारी (दि. २८) घडली होती. दरम्यान, सोमवारी त्याचा मृतदेह सापडल्यानंतर मंगळवारी (दि. ३०) गोवा वनखात्याने त्याच्यासमवेत गेलेल्या बेळगावच्या पाचजणांवर प्रतिबंधित क्षेत्रात विनापरवाना प्रवेश केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

म्हादई अभयारण्य आणि बफर झोनमध्ये प्रवेशास मनाई असतानाही बेळगावमधील सहा पर्यटक तरुणांनी बेकायदेशीर प्रवेश केला. बाराजणांच्या धबधब्यावर आंघोळ करताना आदित्य पाण्यात बुडाला. त्यातच त्याचा मृत्यू झाल्यानंतर एकच खळबळ माजली होती. या घटनेनंतर धबधब्यावरील सुरक्षेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अभयारण्यात ठिकठिकाणी प्रवेश निषिद्ध असल्याबद्दलचे फलक लावण्यात आलेले असतांनाही बेळगावसह अनेक ठिकाणचे पर्यटक बेकायदेशीररित्या अभयारण्यात प्रवेश करून दंगामस्ती करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, मयत आदित्य सप्तती याच्यासमवेत गेलेल्या अन्य पाच तरुणांनी बेकायदा अभयारण्यात प्रवेश केल्याच्या कारणावरुन त्यांच्यावर गोवा वनखात्याने वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच वारंवार अशा घटना घडत असल्याने अभयारण्य आणि धबधब्यावर प्रवेशास पूर्णत: बंदी घालण्यात येत असल्याचे वनखात्याने जाहीर केले आहे.

रविवारी बेळगावसह कर्नाटक आणि गोव्यातील शेकडो तरुण पर्यटनासाठी बाराजण धबधब्यावर गेले होते. सुरुवातीला त्यांना तेथे कार्यरत असलेल्या वनकर्मचाऱ्यांनी प्रवेशास मज्जाव केला. पण, नंतर पर्यटकांकडून चिरीमिरी घेऊन त्यांना जंगलात सोडण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे, वनखात्याच्या भूमिकेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news