बंगळूर : पुढारी वृत्तसेवा
कोण कोणावरील भांडणाचा राग कुठे अन् कसा काढेल? याचा नेम नाही. दहा वर्षांपूर्वी भाऊजींनी आपल्या बहिणीला सोडचिठ्ठी दिली म्हणून मेहुण्याच्या मनात राग धुमसत होता. त्यामुळे त्याने भाऊजींच्या नावे पोलिसांना फोन केला व बंगळूरच्या केंपेगौडा विमानतळावर बॉम्ब ठेवल्याची अफवा उठवली. मेहुण्याने याची कबुली देताच पोलिसांनी चक्क कपाळावर हात मारून घेतला.
देवनहळ्ळी येथील केंपेगौडा विमान तळावरील नियंत्रण कक्षाचा फोन गुरूवारी पहाटे 3.30 च्या सुमारास खणाणला. समोरून फोन करणार्याने विमानतळावर बॉम्ब ठेवल्याचे सांगत फोन ठेवून दिला. हे सांगताना त्याने आपले नाव म्हणून दुसर्याचे सांगितले. परंतु, या वृत्ताने विमान तळावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. बॉम्ब ठेवल्याचा फोन आल्याने एअरलाईन्स गेट, टर्मिनल व विमान तळावर कसून तपास सुरू झाला. परंतु, कुठेच संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. ही अफवाच असल्याचे स्पष्ट झाले.
पोलिस पथकाने आलेल्या क्रमांकाचा शोध घेत याचा गांभीर्यान तपास सुरू केला. यावेळी पोलिसांना धागे मिळत जातील तसे एका तरुणाचे नाव समोर आले. सुभाशीष गुप्ता (रा. पश्चिम बंगाल, सध्या रा. बंगळूर) असे त्याचे नाव असून तो विधानसौध शांतीनगर येथे राहात होता. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला.
अटक करण्यात आलेला सुभाशीष गुप्ता याची बहिण व तिच्या पतीमध्ये 10 वर्षापूर्वी भांडण झाले होते. या भांडणाचे पर्यवसान दोघांची सोडचिठ्ठी होण्यात झाले. आपल्या बहिणीची काहीच चूक नसताना भाऊजीने तिला सोडून दिल्याचा राग सुभाशीषच्या मनात धुमसत होता. तब्बल दहा वर्षांनी त्याचा राग बाहेर पडला खरा परंतु, तो मात्र कारागृहात गेला.