बेळगाव : उत्तर कर्नाटकातील महत्वाचे जलाशय असलेल्या अलमट्टी जलाशयातून बुधवारी सायंकाळी अडीच लाख क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. मंगळवारी हा विसर्ग 1 लाख 35 हजार क्यूसेक होता. विसर्ग 1 लाख 15 हजारने वाढविण्यात आल्यामुळे जलाशयातील पाणीसाठाही कमी झाला असून, तो 90 टक्क्यावरून 84.65 टक्क्यांवर आला आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांसाठी ही दिलासादायक बाब आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा लवकर भरलेल्या अलमट्टी जलाशयात यंदा साडेतीन महिन्यांत तब्बल 462.366 टीएमसी पाणी दाखल झाले असून 367.320 टीएमसी पाणी कृष्णेच्या पात्रात सोडण्यात आले आहे. अजूनही गेल्या चार दिवसांपासून दीड ते दोन लाख क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
यंदा मे महिन्यांपासूनच अलमट्टी जलाशय पाणलोट क्षेत्र परिसरात चांगला पाऊस होत आहे. त्यामुळे, 19 मे पासूनच नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. जवळपास साडेतीन महिने चांगला पाऊस होत असल्यामुळे अलमट्टी जलाशय पात्रात सातत्याने पाण्याची आवक होत राहिली आहे. त्यामुळे, आतापर्यंत 462.366 टीएमसी पाणी दाखल झाले आहे. जूनच्या अखेरपर्यंत जलाशयात निम्म्यापेक्षा अधिक पाणीसाठा करण्यात येऊ नये, असे कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकारच्या बैठकीत ठरले होते. पण, जूनच्या अखेरच्या आठवड्यातच अलमट्टी जलाशयात तब्बल 70 ते 75 टक्के पाणीसाठा झाला होता. त्यानंतर मात्र जलाशयातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला. त्यामुळे, या जलाशयातून आतापर्यंत तब्बल 367.20 टीएमसी पाणी नदीपात्रात सोडून देण्यात आले आहे.
अजूनही पाणलोट क्षेत्रात आणि महाराष्ट्रात पावसाचा जोर असल्यामुळे अलमट्टी जलाशयात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. सध्या 1,14,591 क्युसेक पाण्याची आवक होत असून 2,50,000 क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.