बेळगाव : सर्वसामान्य घरातील तरुण महापौर झाला हे काँग्रेस सरकारला पहावले नसल्यानेच नगरविकास खात्याने सरकारच्या बाजूने निर्णय दिला आहे. सत्तेच्या उन्मादात काँग्रेस सरकारकडून खालच्या पातळीचे राजकारण केले जात असल्याचा आरोप बेळगाव दक्षिणचे आ. अभय पाटील यांनी केला आहे.
मंगेश पवार व जयंत जाधव यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचा प्रादेशिक आयुक्तांनी दिलेला निर्णय नगरविकास खात्याने कायम राखला आहे. यावर आ. पाटील हे आपल्या कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते.
आ. पाटील म्हणाले, प्रादेशिक आयुक्त आणि नगरविकास खात्याला याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार नाही. परंतु, सत्तेचा फायदा उठवत काँग्रेस सरकारच्या दबावाखाली दोघांचे नगरसेवकपद रद्द करण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा आहे. बुधवारी स्थायी समितीची बैठक आहे, त्या दिवशी पुन्हा मंगेश पवार महापौर व जयंत जाधव नगरसेवक राहतील, असा दावाही त्यांनी केला.
उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. परंतु, गरज पडल्यास सर्वोच्च न्यायालयात जाण्याचीही आमची तयारी आहे, असेही पाटील यांनी सांगितले.
खाऊकट्ट्यातील गाळा पत्नीच्या नावे घेतल्याच्या आरोपाबाबत आ. पाटील म्हणाले, त्यांनी पूर्वी गाळे लिलावात बोली लावून घेतले आहेत. त्यानंतर पवार महापौर झाले. बुडा लिलावात एखाद्याला भूखंड मिळाला आणि भविष्यात ती व्यक्ती जर आमदार झाली तर त्याला मिळालेला भूखंड परत करायचा का? जे सर्वसामान्य जनतेला कळते ते सरकारला कळू नये, याचेच आश्चर्य वाटते.
खाऊकट्टयाचे बांधकाम आमदार फंडातून केलेले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याची जागा शोधून तेथे हा प्रकल्प उभारला. अग्नीशामक दलाने जागेवर दावा केला असतानाही ती जागा महापालिकेला मिळावी, यासाठी कसोशीने प्रयत्न केले. खाऊकट्टा हा जनतेसाठी एक उत्तम पर्याय बनला आहे. तेथे आणखी विकास करायचा विचार आहे. परंतु, यामध्ये घाणेरडे राजकारण केले जात असल्याचा आरोपही आ. पाटील यांनी केला.
व्हॅक्सीन डेपो विकासकामातही राजकारण आणले. तेथे जी कामे झाली होती त्यासाठी कोटींचा खर्च केला आहे. आता सर्व कामे रखडली आहेत. ग्लास हाऊस, विश्रांतीगृह यासह अन्य विकासासाठी जो 3 कोटींचा निधी खर्च केला होता, तो पुन्हा खर्चून जुनीच कामे करावी लागणार आहेत. हे नुकसान जनतेचे आहे, असेही आ. अभय पाटील यांनी सांगितले.