

बेळगाव : शहर परिसरात एकूण 180 झाडे धोकादायक स्थितीत आहेत. त्यामधील 100 हून अधिक झाडे तोडण्यासाठी वनखात्याने परवानगी दिली आहे. तर गेल्या चार दिवसांत झालेल्या पावसावेळी शहर परिसरातील 20 झाडे जमीनदोस्त झाली आहेत. त्यात सुदैवानेच जीवितहानी झाली नसली तरी त्यात दुचाकी व चारचाकी वाहनांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शहरातील धोकादायक झाडे हटविण्याची गरज निर्माण झाली आहे.
पावसाला सुरुवात झाल्यापासून झाडे तुटण्याऐवजी उन्मळून पडण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. गुरुवारी जिल्हा पोलिसप्रमुख कार्यालयाजवळील भले मोठे झाड उन्मळून पडले. त्यात संरक्षक भिंतीचे नुकसान झाले. तत्पूर्वी, गेल्या चार दिवसांत रेल्वे स्टेशन, जिल्हाधिकारी परिसर, विश्वेश्वरय्यानगर, उद्यमबाग, वडगाव, शहापूर, श्रीनगर, किल्ला, सदाशिवनगर, नरगुंदकर भावे चौक यांसह विविध ठिकाणी मिळून 20 झाडे जमीनदोस्त झाली आहेत. आठ दिवसांपूर्वी वेंगुर्ला रोडवरील मधुरा हॉटेलजवळ झाडाची मोठी फांदी कोसळून दोन कारचे नुकसान झाले. नरगुंंदकर भावे चौकात शॉर्ट सर्किट झाल्याने हेस्कॉमला फटका बसला होता.
शहर परिसरातील 180 धोकादायक झाडांपैकी 20 नैसर्गिकरित्याच कमी झाली आहेत. अद्याप 160 झाडे तोडण्याच्या प्रतीक्षेत आहेत. झाड पडल्याची घटना घडल्यानंतर ते हटविण्यासाठी वनखात्याने आपत्कालीन पथक तयार केले आहे. या पथकात केवळ चार कर्मचार्यांचा समावेश आहे. झाडे हटविताना महापालिकेच्या कर्मचार्यांनी वेळेत हजेरी लावून सहकार्य केले तर प्रक्रिया लवकू होऊ शकते. परंतु, रात्रीच्या वेळी घटना घडली तरी महापालिकेचे कर्मचारी घटनास्थळी पोचत नाहीत. त्यामुळे, वनखात्याच्या कर्मचार्यांवर अतिरिक्त ताण पडत आहे. मंगळवारी किल्ल्यामध्ये आंब्याचे झाड कोसळले आहे. मात्र, ते अद्याप हटविण्यात आलेले नाही.