6 people killed in bus-car accident near Mangoli village in Bijapur district
अंकली : पुढारी वृत्तसेवा
सोलापूर-हैद्राबाद या राष्ट्रीय महामार्गावर विजापूर जिल्ह्यातील बसवन बागेवाडी तालुक्यातील मनगोळी शहराजवळ आज (बुधवार) पहाटे खासगी प्रवासी वाहतूक बस व स्कार्पिओ या दोन वाहनांमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील चार व दोन वाहनचालक जागीच ठार झाल्याची घटना घडली.
स्कार्पिओ वाहन हैद्राबादहून सोलापूरकडे जात असताना मुंबईहून बळारीकडे निघालेल्या खासगी प्रवासी वाहतूक बसला मनगुळी येथे जोराची धडक बसून भीषण अपघात झाला. अपघातात स्कॉर्पिओ वाहनचालक व प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.
हे सर्वजण तेलंगणा राज्यातील रहिवासी असून कॅनरा बँक व्यवस्थापक टी. भास्करन, त्यांची पत्नी पवित्रा, मुलगा अभिराम व मुलगी जोशना हे जागीच ठार झाले आहेत. त्यांचा आणखी एक मुलगा प्रवीणतेज गंभीर जखमी झाला असून त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
स्कार्पिओ कारचालक विजापूर जिल्ह्यातील असून विकास मकानी असे त्याचे नाव आहे. खासगी प्रवासी वाहतूक बस चालक धारवाड जिल्ह्यातील कलघुटगी गावाचा रहिवासी असून बसवराज राठोड असे त्याचे नाव आहे. स्कार्पिओ चालक व खासगी बसचालक यांचाही अपघातात जागीच मृत्यू झाला. अपघातात एकाच कुटुंबातील चारजण व दोघा चालकांचा अशा 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
घटनास्थळी विजापूर जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबरगी व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. या घटनेची नोंद बसवन बागेवाडी पोलिस ठाण्यात झाली असून पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती विजापूर जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी दिली.