

बेळगाव : गेल्या काही दिवसांपासून महिपाळगड (ता. चंदगड) जंगलात स्थिरावलेल्या चाळोबा गणेश हत्तीचे तांडव सुरुच आहे. रविवारी (दि. 18) रात्री त्याने उचगाव-कोवाड मार्गावरील अतिवाड फाट्यावर (ता. बेळगाव) असलेल्या रसवंतीगृहावर हल्ला चढवला. पत्र्यांची तोडफोड करण्यासह संरक्षक जाळी तोडून खुर्च्यांसह टेबल भिरकावून दिले. या घटनेत रसवंतीगृह चालकाचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.
हत्तीने शुक्रवारी मध्यरात्रीनंतर उचगाव-कोवाड रस्त्यावर पार्क केलेल्या एका कारचा चुराडा केला होता. यानंतर त्याचा उपद्रव काही थांबलेला नाही. तो रात्री महिपाळगड जंगलात विसावा घेतो आणि सायंकाळ होताच मानवी वस्तीत येऊन नुकसान करत आहे. रविवारी रात्री 10.45 च्या सुमारास हत्ती अतिवाड फाट्यावर आला. तेथील यल्लाप्पा आपय्या चिखले यांच्या मालकीच्या रुक्मिणी रसवंतीगृहावर हल्ला केला. याठिकाणी आवाज होताच शेजारील रेड स्टोन हॉटेलमधील कर्मचारी बाहेर आले. त्यांनी हत्तीला हुसकावून लावले. अन्यथा आणखी मोठे नुकसान झाले असते.
मात्र, हत्तीने काही पत्र्यांची मोडतोड केली. रसवंतीगृहाचा नामफलक व संरक्षक जाळी तोडून टाकली. खुर्च्या व टेबल भिरकावून दिल्या. त्यामुळे, चिखले यांना मोठा फटका बसला आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांचा लोखंडी जलकुंभ हत्तीने एक किमी अंतरावर नेऊन टाकला होता. उसाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.
चाळोबा गणेश हत्तीकडून 19 एप्रिलपासून नुकसानीचे सत्र सुरु आहे. आतापर्यंत त्याने मालमत्तांचे नुकसान चालविले आहे. परंतु, तो हिंसक होऊन मानवावर हल्ला करण्याची शक्यता असल्याने बेकिनकेरे, अतिवाड परिसरातील लोक भयभीत झाले आहे. वनखात्याच्या पथकाने या भागात 24 तास गस्त घालावी, अशी मागणी होत आहे.